देशातील महिला सुरक्षा हा ऐरणीवरचा प्रश्न आहे. देशात आज अनेक ठिकाणी मुलींवरील अत्याचारांच्या बातम्या येताना दिसतात. खरंतर ही खेदाची बाब आहे. अनेक स्त्रिया आणि मुली आज समाजात वावरत असताना त्यांचा जीव मुठीत घेऊन असतात. रोज प्रवास करताना मुली व स्त्रियांना पुरुषांच्या वाईट नजरांचा सामना करावा लागतो. सामान्य मुलींसह अनेक कलाकार मंडळींनाही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते.
असंच काहीसं एका मराठी अभिनेत्रीबरोबर झालं आहे आणि ही अभिनेत्री म्हणजे पूजा ठोंबरे. झी मराठीवरील ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेमधून पूजा घराघरांत लोकप्रिय झाली. तिची ही भूमिकाही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली होती. पूजा सोशल मीडियावर फारच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. अशातच तिने एका तरुणानं तिच्याबरोबर केलेल्या वाईट वर्तणूकीबद्दलची पोस्ट शेअर केली आहे.
पूजाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर याबद्दलची पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने असं म्हटलंय, “सकाळी चालत असताना एका ‘अंकल’चा मदतनीस मी अगदी लांब जाईपर्यंत माझ्याकडे एकटक बघत होता. ३ राऊंड्स झाल्यानंतर मी त्याला झापलं आणि ‘अंकल’च्या ग्रुपकडे गेले. हे बघायला की, हा खरंच त्या ‘अंकल’बरोबर आला आहे का? तर तो एका ‘अंकल’बरोबरच आला होता.”

यापुढे पूजा म्हणाली, “मी ‘अंकल’ला हे सगळं सांगितल्यावर ते म्हणाले, ‘अरे लडकियों को तो मैं भी देखता हूँ, इतना क्या…” आणि त्यावर बाजूचे दोन अंकल छान खुलून हसले. माझ्याचबरोबर चालत असलेल्या मुलीकडे पण तो माणूस असंच बघत होता, त्यावर ती म्हणाली, तू जे बोलत होतीस ते मी ऐकलं, पण बोलले नाही कारण ते अंकल आणि मी एकाच सोसायटीमध्ये राहतात.”
यापुढे पूजाने असं म्हटलं, “तर मी हे सगळे यासाठी सांगितलं की, मुलींनो, तुमच्याबरोबर असं होत असेल तर हे नॉर्मल आहे. त्याची इतकी मोठी समस्या करायची काहीही गरज नाही.” यानंतर तिने ‘प्रफुल्लित सकाळ’ असा हॅश्टॅगही लिहिला आहे. दरम्यान, पूजाने तिच्याबरोबर घडलेली घटना सांगितली असून याबद्दल आता पुढे काय कार्यवाही होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.