Popular Singer declines 50 lakh offer: गायक राहुल वैद्य हा क्रिकेटर विराट कोहलीवर केलेल्या टिप्पणीमुळे चर्चेत आहे. त्याने विराट कोहलीचे चाहते त्याच्याहून मोठे जोकर आहेत, असे म्हटले होते. त्यानंतर राहुल वैद्यला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. विराट कोहलीने त्याला सोशल मीडियावर ब्लॉक केल्याच्या उल्लेखदेखील राहुलने केला होता.
नुकतीच राहुल वैद्यने सोशल मीडियावर पुन्हा पोस्ट करीत विराट कोहलीने अनब्लॉक केल्याबद्दल त्याचे आभार मानले. तसेच ट्रोल करणाऱ्यांना उद्देशूनदेखील त्याने पोस्ट शेअर केली. आता गायक एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.
कोणतेही काम, पैसा…
सध्या भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. तुर्कियेने पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दर्शिविला आहे. त्यामुळे भारतातील अनेक कलाकार तुर्कीवर बहिष्कार टाकत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता या यादीत राहुल वैद्यचादेखील समावेश झाला आहे. राहुलने तुर्कीची ५० लाखांची ऑफर नाकारली आहे. तुर्कीमधील एका लग्नात त्याला गाण्यासाठी ५० लाखांची ऑफर देण्यात आली होती.
राहुल वैद्य म्हणाला, “ते मला ५० लाख रुपये देत होते. ही ऑफर खूप आकर्षक होती. मात्र, मी त्यांना सांगितले की कोणतेही काम, पैसा आणि प्रसिद्धी देशापेक्षा मोठे असू शकत नाही. त्यांनी मला इतर काही ऑफर दिल्या होत्या. मात्र, मी त्यांना स्पष्ट सांगितले की मी पैशांसाठी नकार देत नाही. हा मुद्दा त्यापेक्षा कितीतरी महत्वाचा आहे. ही गोष्ट माझ्या वैयक्तिक नाही तर देशाबाबत आहे. आपल्याला आपल्या देशाबरोबर उभे राहावे लागेल.”
राहुल वैद्य पुढे म्हणाला, “ज्या देशाला माझ्या देशाबाबत आदर नाही आणि तो माझ्या देशाचा शत्रू आहे, त्या देशात काम करण्यास मला जराही रस नाही. आज मी जो कोणी आहे, तो फक्त माझ्या देश आणि देशवासियांमुळे आहे. जो कोणी माझा देश व देशवासियांविरोधात जाईल, त्यांचे मनोरंजन केले जाणार नाही.
भारतीय तुर्कीयेमध्ये खूप पैसा खर्च करतात आणि तिथे लग्ने आयोजित करून त्यांना मोठा व्यवसाय देतात. आपण त्यांना कोट्यवधींचा महसूल देतो. ते आपल्याला असा प्रतिसाद देत आहेत. जो देश आपल्याशी प्रामाणिक नाही, त्या देशात आपण पैसे खर्च करणे कसे सुरू ठेऊ शकतो. जो कोणी माझ्या देशाविरुद्ध आहे, तो माझ्याविरुद्ध आहे, हे इतकं सोपं आहे”, अशा भावना राहुल वैद्यने व्यक्त केल्या.
दरम्यान, कामाच्या बाबतीत बोलायचे तर राहुल वैद्य ‘लाफ्टर शेफ्स’ या कार्यक्रमात दिसत आहे.