Prajakta Gaikwad Engagement : प्राजक्ता गायकवाड गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचा साखरपुडा ७ ऑगस्टला थाटामाटात पार पडला. तिच्या होणाऱ्या पतीचं नाव शंभुराज असून ते व्यवसायाने उद्योजक आहेत. प्राजक्ता आणि शंभुराज यांच्या साखरपुड्याला मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटी, दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्रमंडळी उपस्थित होते. प्राजक्ताच्या साखरपुड्यातील बरेच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आता प्राजक्ताने साखरपुड्यातील एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत कृतज्ञता व्यक्त केली आहे. अभिनेत्रीच्या आयुष्यातील या खास प्रसंगी तिला आणि शंभुराज यांना शुभेच्छा देण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजे या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या होत्या.

प्राजक्ताने साखरपुड्यात संयोगिताराजे यांची भेट घेतानाचा सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासह अभिनेत्रीने सुंदर कॅप्शन लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच कोल्हापूरचा कार्यक्रम रद्द करून खास शुभेच्छा देण्यासाठी संयोगिताराजे स्वत: उपस्थित राहिल्या यासठी अभिनेत्रीने त्यांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत.

प्राजक्ता म्हणते, “युवराज्ञी संयोगिताराजे संभाजीराजे छत्रपती यांचे आशीर्वाद मिळाले. युवराज्ञी माँसाहेब यांना बोलले होते… माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात होत आहे. या नवीन वाटचालीतील पहिल्या शुभकार्या प्रसंगी आपले आशीर्वाद लाभावेत ही खूप मनोमन इच्छा आहे. मी आपल्या वाटेकडे डोळे लावून बसेन, तरी आपण नक्की नक्की यावं.”

“आणि काय अहो भाग्य आमचं! सकाळी कोल्हापूरचा कार्यक्रम रद्द करून युवराज्ञी माँसाहेब खास माझ्या विनंतीसाठी आल्या आणि एकच वाक्य म्हणाल्या की, “तुम्ही युवराज्ञीची भूमिका साकारली तर या युवराज्ञींना येणं भाग पडलं आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला शंभूराजे लाभले, सुखाने संसार करा” मन भरून गेलं आणि त्यांच्या येण्यानं आभाळ ठेंगणं वाटलं कारण तेवढा आनंदच झाला होता.” अशी पोस्ट शेअर करत प्राजक्ताने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, प्राजक्ताच्या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी “अविस्मरणीय क्षण”, “जेव्हा खऱ्या राणीसाहेब ऑनस्क्रीन भूमिका साकारणाऱ्या राणीसाहेबांना भेटतात तेव्हाचा हा सुंदर क्षण” अशा असंख्य प्रतिक्रिया दिल्या आहेत.