Prajakta Gaikwad LoveStory : अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा ७ ऑगस्टला थाटामाटात पार पडला. तिच्या पतीचं नाव शंभुराज असून या दोघांच्या साखरपुड्याला मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी व दोघांचे कुटुंबीय उपस्थित होते. प्राजक्ताच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
मात्र, प्राजक्ता आणि शंभुराज यांची पहिली भेट कुठे झाली, त्यांच लग्न कसं जमलं याबद्दल तिच्या चाहत्यांना काहीच माहिती नव्हती. आता अभिनेत्रीने ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत स्वत: याबद्दल खुलासा केला आहे.
प्राजक्ता गायकवाड सांगते, “वयाच्या १८ व्या वर्षांनंतर मला स्थळं येण्यास सुरुवात झाली होती. कारण, महाराणी येसूबाईंची भूमिका साकारल्यावर मी घराघरांत पोहोचले होते. पण, माझं असं होतं की काही झालं तर पदवीपर्यंतच शिक्षण पूर्ण झालं पाहिजे. आमच्या दोघांची भेट तर खूपच खास होती. कारण, माझ्या सिनेमाचं शूटिंग रात्री होतं, नाइट शिफ्ट होती. त्याआधी आम्ही नवीन देवघर घ्यायला जात होतो, समोरून एक ट्रक आला आणि आमच्या गाडीची धडक झाली, मी बरीच हायपर झाले. त्या ड्रायव्हरवर मी भयंकर चिडले तुमच्या मालकाला आताच्या आता बोलवा असं म्हणाले आणि त्याचे मालक हे ( होणारा नवरा शंभुराज ) होते.”
प्राजक्ता पुढे म्हणाली, “ड्रायव्हर दारू प्यायला होता, त्यामुळे हे आल्यावर त्यांनी ड्रायव्हरला सर्वात आधी दोन कानाखाली मारल्या. गाडीचं बरंच नुकसान झालं होतं त्यामुळे आता मी शूटिंगला कसं जाणार वगैरे असे बरेच विचार माझ्या मनात येत होते. पण, त्यांनी संपूर्ण प्रसंग खूप व्यवस्थित हाताळला. तुम्ही काळजी करू नका, मी येतो तुम्हाला सोडायला असंही सांगितलं. अर्थात, या सगळ्यामुळे पुढे आमच्यात चांगली मैत्री झाली. मला भूमिकेमुळे सगळेजण ‘ताई’ बोलायचे पण, शंभुराज यांनी मला कधीच ‘ताई’ वगैरे हाक मारली नव्हती. ते मला मुद्दाम ‘मॅडम’ म्हणायचे. पण, मी त्यांना ‘दादा’ अशीच हाक मारलीये.” यावेळी प्राजक्ता पहिल्या नजरेतच आवडल्याचं शंभुराज यांनी सांगितलं.
“काही दिवसांनी माझ्या घरी लग्नाचा विषय सुरू झाला. मग यांनी मला समोरून विचारलं, मी त्यांना सांगितलं तुम्हाला माझ्या घरी येऊन बोलावं लागेल. मग ते घरी आले, त्यांनी माझ्या घरच्यांची रितसर परवानगी घेतली, त्यांना सांगितलं. माझ्याही आई-बाबांनी माझ्या करिअरबद्दल त्यांना सांगितलं. यादरम्यान, ते सेटवर आले होते, त्यांनी सगळ्या गोष्टी पाहिल्या. माझ्या कामाचं स्वरुप समजून घेतलं. मी सेटवर जरी अभिनेत्री असले तरी, घरी मी सर्वसाधारण मुलगी असते हे त्यांनी खूप जवळून पाहिलंय. त्यांनी आधीच ठरवलं होतं की, लग्न करेन तर हिच्याशीच करेन.” असं प्राजक्ताने सांगितलं.
…अन् शंभुराजने प्राजक्ताला घातली लग्नाची मागणी
“मला त्यांनी पहिल्यांदा लग्नाचं विचारलं होतं, तेव्हा मी नाही म्हणाले होते. कारण, त्यांची मोठी जॉइंट फॅमिली आहे. माझं कसं होईल त्यात मी फिल्म इंडस्ट्रीत काम करते असे बरेच प्रश्न माझ्या मनात होते. पण, त्यांनी सगळ्या गोष्टी मला खूप प्रेमाने समजावून सांगितल्या. त्यांचे आई-बाबा, आमच्या घरच्यांनी माझं मतपरिवर्तन केलं, मला सांभाळून घेतलं. आमच्या दोघांची घरं अगदी १० मिनिटांच्या अंतरावर आहेत. त्यामुळे मला कधी काही वाटलं तरी मी लगेच जाऊ-येऊ शकते. मी असा मुलगा शोधत होते, जो मला, माझ्या करिअरला पाठिंबा देऊ शकेल. त्यांनी मला पहिल्या दिवसापासून, माझ्या करिअरला खूप पाठिंबा केला. आता असं झालंय की हे माझ्या मम्मी-पप्पांशी, भावाशी जास्त कनेक्टेड आहेत.” असं प्राजक्ताने नवऱ्याबद्दल सांगितलं.