Prajakta Gaikwad : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड घराघरांत लोकप्रिय झाली. वैयक्तिक आयुष्यात ७ ऑगस्टला अभिनेत्रीचा साखरपुडा थाटामाटात पार पडला. तिच्या नवऱ्याचं नाव शंभुराज असून ते बिझनेसमन आहेत. प्राजक्ताच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
प्राजक्ता आणि शंभुराज यांची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. एके दिवशी रात्री प्रवास करताना प्राजक्ताच्या गाडीला एका ट्रकने धडक दिली होती. तो ट्रक शंभुराज यांच्या मालकीचा होता. यानंतर त्यांनी ड्रायव्हरला चांगलंच खडसावलं आणि प्राजक्ताची गाडी बंद झाल्याने तिला शूटिंगच्या सेटवर सोडलं. यामुळे दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. शंभुराज यांना प्राजक्ता पहिल्या नजरेतच आवडली होती. त्यामुळे, पुढे त्यांनी अभिनेत्रीला रितसर लग्नाची मागणी घातली.
लग्नाला होकार देण्याआधी प्राजक्ता गायकवाडने ठेवलेली ‘ही’ अट
प्राजक्ता गायकवाड म्हणते, “सुरुवातीपासून त्यांनी माझी प्रत्येक गोष्ट समजून घेतली. जेव्हा यांनी मला लग्नासाठी विचारलं होतं, तेव्हा मी काहीच उत्तर दिलं नव्हतं. कारण, आमची मैत्री खूप चांगली होती. जेव्हा हे सगळं लग्नाचं सुरू झालं तेव्हा, मी एकदा त्यांना विचारलं होतं की, तुम्ही नॉनव्हेज खाता का? तर ते म्हणाले होते, हो…मी नॉनव्हेज खातो. यावर मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं मला नॉनव्हेज खाणारा मुलगा नको आहे.”
“तर, दुसऱ्या दिवशी पंढरपूर जाऊन त्यांनी माळ घातली. ते खरंतर दररोज नॉनव्हेज खात होते, कारण ते पैलवान क्षेत्रातून होते. ३६५ दिवस नॉनव्हेज खाणाऱ्या मुलाने फक्त माझ्यासाठी सगळं सोडलं. गेल्या ८ महिन्यांपासून त्यांनी माळ घातलीये. त्यांनी हे खूप मोठं सॅक्रिफाइज माझ्यासाठी केलं आहे. कारण, त्यांच्या घरी सगळेजण नॉनव्हेज खातात.” असं प्राजक्ताने सांगितलं.
यावर शंभुराज म्हणतात, “माझं ठरलं होतं की मला पाहिजे तर हीच पाहिजे. त्यामुळे मी तिची अट मान्य केली होती.” प्राजक्ता होणाऱ्या पतीचं कौतुक करत पुढे म्हणते, “कुंकवाचा कार्यक्रम पार पडल्यावर दुसऱ्याच दिवशी मी शूटिंगला गेले होते. माझं जळगावला एका चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे त्यामुळे साखरपुड्याची सगळी तयारी त्यांनीच केली होती. माझं सगळं बोलणं फोनवर सुरू होतं. त्यांनी मला प्रत्येक गोष्टीत समजून घेतलंय, त्यांचं व्हिजन खूप क्लिअर आहे.”