Pranit More Viral Video : टीव्हीवरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस १९’चा फिनाले आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. तीन आठवड्यांनी ‘बिग बॉस’चं १९वं पर्व प्रेक्षकांचा निरोप घेईल. पण, या शोमधील स्पर्धक प्रेक्षकांच्या कायमच लक्षात राहतील. ‘बिग बॉस १९’ मधल्या सर्वच स्पर्धकांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. मात्र, मराठमोळ्या प्रणित मोरेची सर्वत्र अधिक चर्चा आहे. अशातच त्याच्या एका कृतीनं चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

‘बिग बॉस’च्या घरात टास्क खेळताना अनेकदा स्पर्धकांमध्ये हाणामारी, भांडण आणि वादविवाद होताना दिसतात. मात्र, काहीवेळेस स्पर्धकांच्या काही कृती प्रेक्षकांचे मन जिंकतात. प्रणितच्या अशाच एका कृतीनं चाहत्यांचं मन जिंकलं आहे. त्याच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर चाहते प्रणितचं भरभरून कौतुक करीत आहेत. प्रणितने असं काय केलंय? चला जाणून घेऊ…

‘बिग बॉस १९’मध्ये सध्या ‘फॅमिली वीक’ सुरू झाला असून सर्व स्पर्धकांच्या घरातील मंडळी त्यांना भेट देण्यासाठी येत आहेत. सोमवारच्या भागात आधी अभिनेत्री कुनिका सदानंद यांच्या मुलाने एंट्री घेतली. मग अभिनेत्री अशनूर कौरचे वडील गुरमित सिंगदेखील लेकीच्या भेटीसाठी ‘बिग बॉस’च्या घरात आले. अशनूरची भेट घेतल्यानंतर गुरमित यांनी घरातील सर्व सदस्यांची भेट घेतली.

यावेळी अशनूरने प्रणितची वडिलांशी भेट घालून दिली, तेव्हा प्रणित सर्वात आधी अभिनेत्रीच्या वडिलांच्या पाया पडला आणि मग त्यांची गळाभेट घेतली. प्रणितचा पाया पडतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओखाली अनेक नेटकऱ्यांनी त्याच्या मराठमोळ्या संस्करांचं कौतुक केलं आहे.

सोशल मीडियावरील या व्हायरल व्हिडीओखालील कमेंट्समध्ये चाहत्यांनी ‘आपला महाराष्ट्रीयन भाऊ’, ‘याला म्हणतात संस्कार’, ‘शेवटी मराठी माणूस’, ‘हीच मराठी माणसाची खरी संस्कृती’, ‘तू हा शो जिंकशील की नाही माहीत नाही, पण तू तुझ्या स्वभावाने आमची मनं जिंकली आहेस’, ‘शेवटी शिकवण आणि संस्कार महत्त्वाचे’ या आणि अशा अनेक कौतुकास्पद प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, आजच्या भागातही काही स्पर्धकांचे कुटुंबीय भेट घ्यायला येणार आहेत. आज (मंगळवार) च्या भागात अभिनेता गौरव खन्नाची पत्नी भेट घेण्यासाठी येणार आहे, तर फरहाना भट्टच्या आईचीही ‘बिग बॉस’च्या घरात एंट्री होईल. तसंच प्रणितला भेटण्यासाठी त्याचा भाऊ येणार असल्याचं म्हटलं जात आहे.