‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो जगभरात लोकप्रिय आहे. काही दिवसांपूर्वीच या शोमध्ये सध्याचे रीलस्टार आणि विविध माध्यमांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांबाबत एक स्किट सादर करण्यात आलं होतं. अलीकडच्या काळात कलाकारांचा अभिनय न पाहता त्यांचे इनस्टाग्राम फॉलोअर्स पाहून कास्टिंग केलं जातं, हा मुद्दा मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी उपस्थित केला आहे.
हास्यजत्रेच्या मंचावर यासंदर्भातील स्किट सादर झाल्यावर प्रसाद ओकने लेखक व संपूर्ण टीमचं कौतुक करत आपली प्रतिक्रिया दिली. प्रसाद म्हणतो, “हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. रील्स करून ज्यांना वाटतं की आपण अभिनेता किंवा अभिनेत्री आहोत…हा प्रचंड मोठा गैरसमज समाजात पसरत चालला आहे. ज्या लोकांच्या रील्सला लाखो व्ह्यूज आहेत त्यांचं नाटक पाहण्यासाठी १० माणसं सुद्धा येत नाहीत, हे वास्तव आहे. त्यामुळे रील व्हिडीओ करून आपण स्टार होऊ असं कोणाला वाटत असेल तर हा खूप मोठा भ्रम आहे, गैरसमज आहे. रील्स म्हणजे अभिनय नाही…हा विषय सर्वांपर्यंत पोहोचणं अत्यंत महत्त्वाचं होतं. या स्किटद्वारे अनेक जणांना विविध गोष्टी शिकता येतील, ज्यांना काही शिकायचं नाहीये त्यांचा मार्ग देखील मोकळा आहे.”
प्रसाद ओकचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विविध मराठी सिनेमे आणि ‘इंद्रायणी’, ‘देवमाणूस २’ अशा मालिकांमध्ये काम केलेला अभिनेता महेश बेलदारने हा व्हिडीओ रिशेअर करत प्रसाद ओक सरांनी अत्यंत समर्पक मुद्दा मांडल्याचं म्हटलं आहे.
महेश बेलदार म्हणतो, “प्रसाद ओक सरांनी जो मुद्दा मांडला, तो अत्यंत समर्पक आहे. हा मुद्दा मांडणं खूपच गरजेचं होतं. काही दिवसांपूर्वी मी एका सिनेमासाठी ऑडिशन दिली होती. त्या सिनेमात माझं सिलेक्शन झालं, मला तारखा कळवल्या. पण, त्यानंतर माझं इन्स्टाग्राम प्रोफाइल चेक करण्यात आलं…आणि माझे फॉलोअर्स जास्त नाहीयेत. त्यामुळे फॉलोअर्स पाहिल्यावर त्यांनी पुन्हा फोन केला आणि तुम्हाला आम्ही भूमिकेविषयी कळवतो, त्याशिवाय तुम्ही गृहित धरू नका असं सांगितलं. त्यानंतर मला अजूनही फोन आलेला नाहीये. प्रसाद ओक सरांनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’सारख्या इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरून हा मुद्दा मांडला हे चांगलं झालं. कारण, कधीच इन्स्टाग्राम फॉलोअर्सवरून एखाद्याबद्दल विशिष्ट मत बनवून घेणं चुकीचं आहे.”
दरम्यान, महेशने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेक मराठी कलाकारांच्या कमेंट्स आल्या आहेत. तर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी या व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. “सोशल मीडिया, नाटक, चित्रपट यांचे प्रेक्षक फार वेगळे आहेत…. Reel or Real खूप फरक आहे…”, “इंडस्ट्रीत गॉडफादर असल्याशिवाय करिअर घडत नाही त्यामुळे रील्समुळे अनेकांना व्यासपीठ मिळालं असं म्हणायला हरकत नाही” अशाही प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.