‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. ‘स्टार प्लस’वरील ‘ये हैं मोहब्बते’ या मालिकेवर आधारित असलेल्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला सुरुवातीला ट्रोल केलं गेलं. हिंदी मालिकेचा रिमेक असल्यामुळे टीका केली गेली. पण अभिनेत्री तेजश्री प्रधान, राज हंचनाळे, अपूर्वा नेमळेकर, शुभांगी गोखले, संजीवनी जाधव, इरा परवडे, उमेश घाडगे, कोमल सोमारे असे अनेक कलाकार झळकलेल्या या मालिकेने अल्पावधीतचं प्रेक्षकांची मनं जिंकली आणि टीआरपीच्या स्पर्धेत अव्वल स्थान निर्माण केलं.
सुरुवातीला काही आठवड्यात ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेने टीआरपी यादीत अव्वल स्थानावर असलेल्या ‘ठरलं तर मग’ मालिकेला मागे टाकलं. पण, त्यानंतर ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका दुसऱ्या, तिसऱ्या स्थानावर पाहायला मिळाली. या मालिकेतील मुक्ता आणि सागरची जोडी प्रेक्षकांच्या खूप पसंतीस उतरली. तसंच इतर पात्रांनी देखील प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं. त्यामुळे आज मालिकेतील कलाकारांना त्या पात्रांनुसार ओळखलं जातं. अशा या लोकप्रिय मालिकेने नुकताच ४५० भागांचा टप्पा गाठला. यानिमित्ताने ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या सेटवर कलाकारांनी सेलिब्रेशन केलं.
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर केला आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, “‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेने ४५० भागांचा टप्पा पार केल्यानिमित्ताने संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. संपूर्ण टीम आणि चॅनेलच्या मेहनतीचं हे यश आहे. सर्व आव्हाने आणि अडथळे असूनही, आम्ही नेहमीपेक्षा मजबूत, पाठीशी उभे राहिलो. मला या प्रवासाचा भाग असल्याचा अभिमान आहे. पुढील अनेक टप्पे गाठण्यासाठी शुभेच्छा.”
View this post on InstagramThis quiz is AI-generated and for edutainment purposes only.
काही दिवसांपूर्वी ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मोठा बदल झाला. या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकलेल्या तेजश्री प्रधानने अचानक रामराम केला. तिच्या ऐवजी आता स्वरदा ठिगळे पाहायला मिळत आहे. मालिकेत मुक्ताच्या भूमिकेत स्वरदाला पाहून काहींनी तिचं कौतुक केलं, तर काही जण अजून टीका करत आहेत.