Premachi Goshta : ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री तेजश्री प्रधानने एक्झिट घेतली. या मालिकेत ती मुक्ता कोळी ही व्यक्तिरेखा साकारत होती. तेजश्रीच्या एक्झिटनंतर आता मालिकेत नवीन मुक्ता झळकणार आहे. नवीन मुक्ता म्हणून मालिकेत अभिनेत्री स्वरदा ठिगळेने एन्ट्री घेतली आहे.

नव्या मुक्ताबरोबर शूटिंगला सुरुवात झाली असून, येत्या १७ जानेवारीला हा एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेजश्री प्रधानचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मुक्ताची भूमिका साकारताना मनात काय भावना होत्या यावर अभिनेत्री स्वरदा ठिगळेने ‘लोकमत फिल्मी’शी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे.

स्वरदा ठिगळे भूमिकेबद्दल काय म्हणाली?

स्वरदा ठिगळे म्हणाली, “आईची भूमिका मी पहिल्यांदाच ऑनस्क्रीनवर साकारतेय त्यामुळे नक्कीच धाकधूक आहे. पडद्यावर आईची भूमिक साकारणं ही मोठी गोष्ट आहे…मी याकडे एक चॅलेंज म्हणूनच बघतेय. स्टार प्रवाहने माझ्यावर विश्वास टाकला यासाठी मी त्यांची खूप जास्त आभारी आहे. नवीन वर्ष, नवीन शो आणि त्यात माझी खऱ्या आयुष्यात सुद्धा ही पहिलीच संक्रांत आहे. त्यामुळे खरंच खूप छान वाटतंय. मुक्ताची सासू असो किंवा माझी खरी सासू सगळेच माझी संक्रांत साजरी करण्यासाठी उत्सुक आहेत.”

रिप्लेसमेंटच्या भूमिका साकारताना भीती वाटते का? यावर अभिनेत्री म्हणाली, “रिप्लेसमेंटची भीती वाटत नाही. कारण, तुम्ही एक कलाकार असता…तुमचा एक प्रवास असतो. एखादा शो करणं, त्यानंतर शोमधून एक्झिट घेण ही सगळी एक प्रक्रिया आहे. या सगळ्या प्रक्रियेत आपण प्रामाणिकपणे काम करतोय हेच खूप जास्त महत्त्वाचं आहे. दीड वर्ष संपूर्ण टीम काम करतेय…मी सुद्धा आता याचा एक भाग आहे त्यामुळे खूप चांगलं काम करण्याचा प्रयत्न असेल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जुन्या मुक्ताला मिस करतोय का? असा प्रश्न सागरची भूमिका साकारणाऱ्या राज हंचनाळेला विचारण्यात आला. यावर अभिनेता म्हणाला, “आमची चांगली मैत्री होती…त्यामुळे मिस नक्कीच करतोय. पण, स्वरदाबरोबर काम करताना सुद्धा मजा येतेय. आता तीनच दिवस झालेत…तरीही एकत्र काम करताना सगळे सीन्स व्यवस्थित होत आहेत. येत्या काळात आम्ही आणखी मेहनत करू आणि प्रेक्षकांचं सुद्धा तेवढंच प्रेम मिळेल याची मला खात्री आहे.”