Yuvika Chaudhary Prince Narula : प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी यांनी लग्नानंतर ६ वर्षांनी त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं. त्यांची मुलगी एका वर्षाची झाली आहे. प्रिन्स व युविकाच्या लेकीचं नाव एकलीन आहे. युविका नैसर्गिकरित्या गर्भधारणा करू शकली नव्हती, त्यामुळे तिने आयव्हीएफचा पर्याय निवडला होता. पण हा प्रवास अजिबात सोपा नव्हता.
युविकाने सांगितलं की तिला आयव्हीएफबद्दल फारशी माहिती नव्हती. “मी डॉक्टरांकडे गेले आणि त्यांनी मला घाबरवलं. त्यांनी सांगितलं मला मुलं होऊ शकत नाहीत, कदाचित त्यांना माझ्याकडून पैसे कमवायचे असतील. मी खूप घाबरले आणि अस्वस्थ झाले, मी प्रिन्सला सांगितलं की आपण बाळासाठी प्रयत्न करायला पाहिजे,” असं युविका म्हणाली.
३ वर्षे घेतले उपचार
आयव्हीएफची प्रकिया अजिबात सोपी नसते. “मी जवळपास ३ वर्षे या फेजमध्ये होते. भीती, गोंधळ आणि वेळ हातातून निसटत आहे, ही भावना होती. मला बाळ हवं होतं. मला खूप दबाव जाणवत होता. प्रिन्स निवांत होता,” असं युविका चौधरी म्हणाली.
डॉक्टरांनी सांगितलं असं काही की…
“एका डॉक्टरने मला म्हटलं की माझे एग्ज (बीजांड) खराब झाले आहे. तेव्हा मी ३८ वर्षांची होते. डॉक्टरांनी ज्या पद्धतीने हे सांगितलं, मला स्वतःवरच शंका येऊ लागली. त्यामुळे डॉक्टरांचं योग्य मार्गदर्शन मिळणं खूप गरजेचं असतं,” असं मत युविका चौधरीने व्यक्त केलं.
प्रिन्स नरुला-युविका चौधरीला आलेला वाईट अनुभव
“जेव्हा मला समजलं की मी आई होऊ शकत नाही, तेव्हा माझा आत्मविश्वास शून्यावर पोहोचला. आम्ही जवळपास दोन-अडीच लाख रुपये खर्च केले होते. रोज पोट व मांड्यांवर इंजेक्शन दिले जायचे. मला खूप त्रास होत होता. एकेदिवशी मला बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शन दिलं जात होतं, त्यावेळी ‘जर हिला पुन्हा कधीच शुद्ध आली नाही, तर ती आमची जबाबदारी नसेल, असं क्लिनिककडून सांगण्यात आलं.’ त्यावेळी आम्ही ते क्लिनिक सोडायचं ठरवलं. या अनुभवानंतर मानसिक स्थिती सुधारल्यानंतर आम्ही दुसऱ्या डॉक्टरांना भेटलो. मग हळुहळू आत्मविश्वास आला आणि मग आयव्हीएफच्या पहिल्याच प्रयत्नात मी गरोदर राहिले,” असं युविका चौधरी म्हणाली.
प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी बिग बॉस ९ मध्ये स्पर्धक होते. इथेच ते एकमेकांच्या जवळ आले. हा शो संपल्यानंतर सुमारे तीन वर्षे डेटिंग केल्यानंतर, त्यांनी २०१८ मध्ये लग्न केले. प्रिन्सपेक्षा युविका ७ वर्षांनी मोठी आहे. या जोडप्याला लग्नानंतर सहा वर्षांनी २०२४ मध्ये मुलगी झाली.
