Priya Marathe’s death : प्रिया मराठेच्या निधनाची बातमी समोर येताच संपूर्ण मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. तिने ‘चार दिवस सासूचे’, ‘बडे अच्छे लगते है’, ‘पवित्र रिश्ता’ अशा गाजलेल्या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. प्रिया गेल्या काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होती. मात्र, वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी तिची प्राणज्योत मालवली.
३१ ऑगस्ट रोजी सकाळी मीरारोड येथील राहत्या घरी प्रियाने अखेरचा श्वास घेतला. तिच्या निधनानंतर मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी भावनिक पोस्ट शेअर करत तिला श्रद्धांजली वाहिली आहे. काही कलाकारांनी प्रियाबरोबरच्या भावुक आठवणी देखील सांगितल्या आहेत.
प्रिया मराठेचं इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांशी खूप छान बॉण्डिंग होतं. लोकप्रिय अभिनेत्री राजश्री निकम यांनी पोस्ट शेअर करत प्रियाला त्या शेवटच्या केव्हा भेटल्या होत्या, याबद्दलची भावनिक आठवण सांगितली आहे. त्या प्रियाला प्रेमाने ‘वेडे’ अशी हाक मारायच्या. गेल्यावर्षी तिची प्रकृती बरी झाल्यावर राजश्री निकम व वंदना सरदेसाई या दोघीजणी प्रियाला भेटण्यासाठी तिच्या घरी गेल्या होत्या. पण, त्यानंतर पुन्हा प्रकृती बिघडल्यावर प्रियाने भेटायला येऊ नका असं सांगितलं होतं…असं राजश्री यांनी त्यांच्या पोस्टमध्ये सांगितलं आहे.
प्रिया मराठेच्या आठवणीत भावनिक पोस्ट
अगं वेडे, गेल्यावर्षी तू बरी झाल्यावर आपण तुझ्या घरी भेटलो. तेव्हाचा हा फोटो… तू, मी, वॅन्डीने ( वंदना सरदेसाई ) खूप गप्पा मारल्या, पोट दुखेपर्यंत हसलो आणि एकमेकींना मिठी मारून रडलो आणि तू म्हणाली होतीस Now No Looking Back. वेडी My brave वेडी… Group मध्ये असेच आपण एकमेकांना वेडे म्हणतो. त्यादिवशी ही वेडेपणा केला आपण. रात्री तू आम्हाला See Off करायला खाली आलीस आणि समोरून लग्नाची वरात जात होती. आपण दोघींनी एकमेकींना नजरेने विचारलं करायचा का वेडेपणा? वॅन्डी नको-नको म्हणत असताना आपण दोघी त्या गाण्यावर जवळ-जवळ १५ मिनिटं रस्त्यावर मनसोक्त नाचलो. यार… वॅन्डीने Video करायला हवा होता. तो दिवस होता ३० जानेवारी २०२४. नंतर भेटलोच नाही…केवळ तुझ्या हट्टापायी.
न भेटणं हा तुझा वेडा हट्ट होता वेडे…
आज इच्छा असूनही तुला भेटायला येता येत नाही. वाई येथे Shooting करत असल्यामुळे, बघितलंस म्हणून असे वेडे हट्ट करू नये वेडे….
प्रियाऽऽऽऽऽऽऽऽ Love you वेडे
दरम्यान, राजश्री निकम यांनी प्रियाच्या आठवणीत शेअर केलेल्या या पोस्टवर सिनेविश्वातील कलाकार व चाहत्यांनी प्रतिक्रिया देत दु:ख व्यक्त केलं आहे. प्रियाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झाल्यास, प्रिया आणि शंतनू मोघे यांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यांनी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत एकत्र कामही केलं होतं.