Priya Marathe and Shrikant Moghe: श्रीकांत मोघे यांची नाट्य, चित्रपट व टीव्ही अभिनेता म्हणून ओळख होती. अनेक नाटकांमधून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. ‘लेकुरे उदंड जाहली’, ‘वाऱ्यावरची वरात’ अशा नाटकांमधील त्यांची पात्रे मोठ्या प्रमाणात गाजली.
‘पुलकित आनंदयात्री’ या एकपात्री प्रयोगासाठी श्रीकांत मोघे यांनी अमेरिका, युरोप, दुबई अशा ठिकाणचा दौरा केला होता. अभिनयाबरोबरच त्यांच्या नृत्यासाठीदेखील ते ओळखले जात होते.
श्रीकांत मोघे यांचा मुलगा शंतनू मोघे हा देखील अभिनेता आहे. शंतनूची पत्नी दिवगंत प्रिया मराठेदेखील अभिनय क्षेत्रात काम करत होती. तिच्या अनेक मालिकांमधील सकारात्मक व नकारात्मक दोन्ही पद्धतीच्या भूमिका गाजल्या. अभिनेत्रीचे ३१ ऑगस्ट २०२५ ला कर्करोगाने निधन झाले.
पण, तुम्हाला माहितेय का प्रिया व तिचे सासरे श्रीकांत मोघे यांच्यात खास बॉण्डिंग होते. तिला ते वडिलांसारखे होते आणि श्रीकांत मोघेदेखील प्रियावर मुलीप्रमाणे प्रेम करायचे. २०२१ मध्ये श्रीकांत मोघे यांचे निधन झाले. त्यानंतर प्रियाने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या.
प्रियाने लिहिलेली भावुक पोस्ट
प्रियाने लिहिले होते, “माझा बाबा! इतकं प्रेम, माझा नवरा सोडल्यास क्वचितच कोणी माझ्यावर केलं असेल. सासरे फक्त म्हणायला होते. तो मला बाबापेक्षाही जवळचा. माझं पीयूडं, माझं लाडकं अशी हाक मारत दोन्ही हात पसरून, मला मिठीत घ्यायचा. प्रयोग संपवून आले असले की आज किती बुकिंग होतं, प्रयोग कसा झाला, पुढचा कुठे आहे, असे सगळे प्रश्न विचारायचा.”
“बाबा आणि मुलाचं हे असं नातंही मी पहिल्यांदाच पाहिलं. शंतनू बाबाचे गालगुच्चे घ्यायचा, त्याला प्रेमानी अक्षरशः चुरगळून टाकायचा आणि ते बाबाला अत्यंत सुख देऊन जायचं. गेली काही वर्ष तो व्हीलचेअरवर होता, पण तरी त्याच्या चेहेऱ्यावर मी कधीच, एका क्षणासाठीसुद्धा उदासीनता पाहिली नाही. उलट आम्हाला लाजवेल इतका उत्साहच कायम पाहिला. मित्रा, एका जागी नाही असे फार थांबायचे हे धोरण मानून कशातच तो फार अडकला नाही.”
“हा वाहणारा प्रेमाचा धबधबा थांबला, पण माझ्या कुटुंबाच्या मनात त्याचं प्रेम आणि रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यात त्याचा ज्वलंत अभिनय कायमच जिवंत राहील.” दरम्यान, प्रियाच्या अकाली निधनाने कलाकारांसह चाहत्यांनादेखील मोठा धक्का बसला आहे.