Ram Kapoor On transformation : राम कपूर हा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे. ‘बडे अच्छे लगते हैं’ या मालिकेतून तो घराघरात पोहोचला. आजही या मालिकेमुळे त्याला ओळखलं जातं. अभिनेत्री साक्षी तन्वर व राम कपूर यांची ही मालिका हिंदी टेलिव्हिजनवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेसह त्यानं इतर काही प्रसिद्ध मालिकांमध्येही काम केलं आहे.
राम कपूरची महत्त्वपूर्ण भूमिका असलेली ‘मिस्री’ ही वेब सीरिजसुद्धा नुकतीच प्रदर्शित झाली आहे. काही दिवसांपासून तो या वेब सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यग्र होता. यावेळी त्यानं अनेक मुलाखती दिल्या. यादरम्यान राम कपूरनं अनेक विषयांवर त्याची मतं मांडली. त्यानंतर तो अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला. त्यासह त्यानं त्याच्या ट्रान्स्फॉर्मेशनबद्दलही माहिती दिली आहे.
राम कपूरनं तब्बल ५० किलो वजन घटवलं होतं. त्यानंतर त्याच्यामध्ये मोठा बदल झाल्याचं जाणवलं. अशातच आता रामनं नुकतीच भारती सिंह व तिचा नवरा हर्ष लिंबाचिया यांच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्यानं त्याच्या आरोग्याच्या समस्यांबद्दल सांगितलं. राम कपूर म्हणाला, “जेव्हा मी स्कॉटलँड येथे चित्रीकरण करीत होतो तेव्हा माझी अवस्था खूपच वाईट झाली होती. मी दिवसातून तीन वेळा जेवणापूर्वी इन्सुलिनचं इंजेक्शन घेत होतो”
राम कपूर याबाबत सांगताना पुढे म्हणाला, “माझं वजन १४० किलो होतं आणि तेव्हा मला मधुमेहचा खूप त्रास व्हायचा. त्यामुळे माझ्या डॉक्टरांनी मला मी खूप काम करीत असल्यानं त्याचा परिणाम माझ्या आरोग्यावर होत असल्याचं सांगितलं. आणि माझी प्रकृती खूपच खराब असल्यानं मला मधुमेहामुळे अर्धांगवायूचा झटका येऊ शकतो, असं सांगितलेलं”.
राम कपूर पुढे वजन घटवल्याबद्दल म्हणाला, “मी इतका अस्वस्थ होतो की, मला वजन कमी करावं लागलं. नाही तर माझ्या जीवाला धोका निर्माण झाला असता, असं डॉक्टरांनी सांगितलेलं”. राम कपूरनं त्याच्या मुलाला पन्नाशी गाठल्यानंतर तो स्वत:कडे अधिक लक्ष देऊन सिक्स पॅक अॅबसाठी मेहनत घेणार, असं वचन दिलं होतं. तो म्हणाला, “जेव्हा मी ट्रान्स्फॉर्मेशनसाठी काम करायला सुरू केलं तेव्हा ठरवलेलं की, मला प्रकृतीमध्ये सुधारणा करायची आहे. निरोगी आयुष्य जगायचं आहे. मला माझ्या मुलासाठी एक आदर्श निर्माण करायचा आहे”.
राम कपूर पुढे त्याच्या ट्रान्स्फॉर्मेशनबद्दल म्हणाला, “माझ्यासाठी हा निर्णय घेणं अवघड होतं. कारण- गेली २५ वर्षं मी जसा आहे, तसं मला प्रेक्षकांनी स्वीकारलं आहे आणि आता यामुळे माझ्यामध्ये मोठा बदल होणार होता. पण वजन कमी करण्यापलीकडे माझ्याकडे कुठला पर्याय नव्हता”.