गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक आघाडीचे मराठी कलाकार उद्योजक बनले आहेत. या यादीत नुकतंच अनघा अतुलचं नाव सामील झालं. भगरे गुरुजींची लेक अभिनेत्री अनघा अतुल हिने नुकतंच तिच्या भावाबरोबर मिळून स्वतःचं ‘वदनी कवळ’ हे हॉटेल पुण्याच्या डेक्कन परिसरात सुरू केलं आहे. आतापर्यंत तिच्या या नवीन हॉटेलमध्ये तिचे काही कलाकार मित्रमंडळी जेवणाचा आस्वाद घेऊन गेले. पण या हॉटेलमध्ये शूट केलेल्या एका व्हिडीओमुळे अभिनेत्री रेश्मा शिंदे चांगलीच ट्रोल होत आहे.
अभिनेत्री रेश्मा शिंदे आणि अनघा अतुल यांनी ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेमध्ये एकत्र काम केलं होतं. या मालिकेच्या निमित्ताने त्या दोघींमध्ये चांगली मैत्री झाली. अनघाच्या या नव्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी रेश्मा तिच्या नवीन हॉटेलमध्ये जेवायला आली होती. पण जेवणापूर्वी तिने केलेली एक कृती पाहून नेटकरी तिच्यावर संतापले आहेत.
‘वदनी कवळ’ या हॉटेलमध्ये खवय्यांना शुद्ध शाकाहारी थाळीचा आस्वाद घेता येत आहे. त्यामुळे मराठमोळ्या पद्धतीचं जेवण करायला तिथे गेलेल्या रेश्माने जेवणापूर्वी ‘वदनी कवळ’ हा श्लोक म्हणतानाचा एक व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला. पण हा श्लोक शांतपणे आणि भक्ती भावाने म्हणण्याच्या ऐवजी ती तो किंचाळून म्हणताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. अशाप्रकारे तिने हा श्लोक म्हटल्याचं अनेकांना खटकलं आणि त्यांनी रेश्माची चांगलीच कान उघडणी केली आहे.
या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिलं, “आदराने म्हटलं पाहिजे, मस्करी वाटते. निदान सेलिब्रिटीने तरी पाळावं ही अपेक्षा.” तर दुसरा म्हणाला, “किती किंचलतायात ?” तिसऱ्याने लिहिलं, “अन्न हे पुर्णब्रम्ह आहे ना मग इतके किंचाळत का प्रार्थना करताय? जरा आदर ठेवा त्या पूर्णब्रम्हाबद्दल. इतकी ओव्हरॲक्टिंग करू नका.” तर आणखी एकाने लिहिलं, “फक्त टिंगल चालली आहे.” आणखी एकजण म्हणाला, “लहान मुलंही शिस्तीत म्हणतील.” तर “एवढं किंचाळण्यापेक्षा न म्हटलेलं बरं,” असंही एकाने लिहिलं. त्यामुळे आता रेश्माच्या या वागण्याबद्दल सोशल मीडियावरून नापसंती व्यक्त केली जात आहे.