‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेद्वारे श्रेयस तळपदेने टेलिव्हिजन विश्वामध्ये पुनरागमन केले. थोड्याच काळामध्ये श्रेयस आणि प्रार्थना बेहरे यांची यश-नेहा ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. मालिकेमध्ये प्रत्येक पात्र त्यांना आपलेसे वाटू लागले. मध्यंतरी ही मालिका बंद होणार असल्याचे म्हटले जात होते. मिळालेली ही माहिती खोटी असल्याचे निर्मात्यांनी स्पष्ट केले होते.
सध्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेमध्ये नवा ट्विस्ट आला आहे. यश आणि नेहाच्या अपघात झाला असल्याचा ट्रॅक सुरु आहे. अपघातामध्ये यशला गंभीर दुखापत होते, तर नेहाचे निधन होते. नेहाच्या जाण्याचा यश आणि परी यांच्या आयुष्यावर झालेला परिणाम मागच्या काही भागांमध्ये दाखवण्यात आला आहे. याच सुमारास प्रार्थनाने सोशल मीडियावर एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवरुन ती मालिकेमध्ये अनुष्का हे नवे पात्र साकारत असल्याचे लक्षात येत आहे.
प्रार्थनाचा हा नवा लुक प्रेक्षकांना आवडला आहे. तिच्या अनुष्का या पात्रासह जयंतीलाल मेहता या नव्या पात्राची एन्ट्री मालिकेमध्ये होणार आहे. हा जयंतीलाल मेहता कोण आणि त्याचा अनुष्काशी कसले संबंध आहेत हे रहस्य पुढच्या भागांमध्ये उलगडणार आहे. अभिनेते माधव अभ्यंकर या मालिकेमध्ये जयंतीलालच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत. अनुष्कानंतर जयंतीलाल मेहताच्या येण्याने मालिकेमध्ये नवीन काय घडणार आहे याबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.
आणखी वाचा – रिषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ची जगभर हवा, पंतप्रधान नरेंद्र मोदीही चित्रपट पाहणार?
‘रात्रीस खेळ चाले २’ मालिकेमध्ये माधव अभ्यंकर अण्णा नाईक ही भूमिका साकारली होती. त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक झाले होते. ते बऱ्याच वर्षांपासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. या अजरामर भूमिकेमुळे त्यांना नवी ओळख मिळाली.