Reshma Shinde Dance Video : लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदेला छोट्या पडद्यावरची लाडकी सून म्हणून ओळखलं जातं. कारण, आजवर अनेक मालिकांमध्ये तिने आदर्श सुनेच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘रंग माझा वेगळा’मधील दिपा असो किंवा सध्या सुरू असलेल्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेतील जानकी…रेश्मा कायमच तिच्या सहज-सुंदर अभिनयाने प्रत्येकाचं लक्ष वेधून घेते.
रेश्मा शिंदे सोशल मीडियावर सुद्धा कायम सक्रिय असते. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अभिनेत्री नुकतीच तिच्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेतील सहकलाकारांसह व्हायरल गाण्यावर थिरकली. हा व्हिडीओ रेश्माने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
रेश्माने तिची ऑनस्क्रीन जाऊबाई अवंतिका म्हणजे अभिनेत्री ऋतुजा कुलकर्णी, ऑनस्क्रीन सासूबाई सुमित्रा म्हणजेच अभिनेत्री सविता प्रभुणे आणि अभिनेत्री नयना आपटे या अभिनेत्रींसह एकत्र मिळून “ठुमक -ठुमक जांदी है माहिये दे नाल” या ट्रेंडिंग गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. ‘ठुमक -ठुमक’ हे नेहा भसीनचं पंजाबी गाणं गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्रामवर ट्रेंड होत आहे. अनेक सेलिब्रिटींनी यावर डान्स व्हिडीओ बनवले आहेत.
“ठुमक-ठुमक नाचना तो बनता है…” – रेश्मा शिंदेची पोस्ट
रेश्मा शिंदे व तिच्या सहकलाकारांनी या ट्रेंडिंग गाण्यावर डान्स करण्यामागे एक खास कारण होतं. ते कारण म्हणजे, नुकतेच ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेचे ५०० भाग पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने या कलाकारांनी ट्रेंडिंग गाण्यावर डान्स करत आपला आनंद साजरा केला.
“ठुमक-ठुमक नाचना तो बनता है…कारण आमच्या मालिकेचे ५०० भाग पूर्ण झाले आहेत. हा टप्पा किती मोठा आणि अविश्वसनीय आहे. सगळ्या टीमने मेहनत घेतल्यामुळे आम्ही हे यश मिळवू शकलो. याला खऱ्या अर्थाने टीमवर्क म्हणू शकतो. अजून खूप मोठा टप्पा गाठायचा आहे. हा आम्हा सर्वांसाठी अभिमानाचा क्षण असून मी यासाठी कायम कृतज्ञ असेन” असं रेश्माने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील अभिनेत्रींच्या या ‘ठुमक-ठुमक; डान्सवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. याशिवाय ५०० भागांबद्दल टीमचं अभिनंदन केलं आहे.