Reshma Shinde : ‘घरोघरी मातीच्या चुली’, ‘रंग माझा वेगळा’, ‘नांदा सौख्यभरे’ या मालिकांमधून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजेच रेश्मा शिंदे. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. बहुतांश मालिकांमध्ये आदर्श सुनेची भूमिका साकारल्यामुळे रेश्माला छोट्या पडद्याची लाडकी सून म्हणून देखील ओळखलं जातं.
रेश्मा शिंदेने वैयक्तिक आयुष्यात नोव्हेंबर २०२४ मध्ये लग्नगाठ बांधली. रेश्माच्या नवऱ्याचं नाव पवन असून तो साऊथ इंडियन आहे. पवन आयटी क्षेत्रात काम करतो. गुढीपाडवा असो किंवा वटपौर्णिमा लग्नानंतर रेश्मा आणि पवन प्रत्येक सण मोठ्या आनंदाने साजरे करत असल्याचं पाहायला मिळतं. काही दिवसांपूर्वी रेश्मा तिच्या पतीसह उडुपीला गेली होती. यावेळी अभिनेत्रीने तिच्या सासरच्या कुटुंबीयांसह देवदर्शन केलं होतं. आता अभिनेत्रीने नुकतंच महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीचं दर्शन घेतलं आहे.
रेश्मा शिंदे, तिचा पती पवन, अभिनेत्रीचे आई-बाबा, सासरे असे सगळे कुटुंबीय नुकतेच तुळजापूरला गेले होते. अभिनेत्रीने सहकुटुंब ‘आई तुळजाभवानी’ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. याचे फोटो रेश्माने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. “कुलस्वामिनी आई तुळजाभवानी… जगदंब” असं कॅप्शन रेश्माने या फोटोंना दिलं आहे.
रेश्मा शिंदेने यावेळी फिकट निळ्या रंगाची साडी, नाकात नथ, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा, केसात गजरा असा पारंपरिक लूक केला होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, रेश्माने नेसलेली सुंदर साडी तिला हर्षदा खानविलकरांनी गिफ्ट दिलेली आहे. यामुळेच रेश्माने, “माहेरची साडी- हर्षदा खानविलकर” असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
रेश्मा शिंदेचे हे फोटो चाहत्यांच्या देखील पसंतीस उतरले आहे. दरम्यान, अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, रेश्माने आजवर मालिकांमध्ये साकारलेल्या साध्या-सोज्वळ पण, तेवढ्याच खंबीर अशा भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सध्या ती ‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत जानकी ही प्रमुख भूमिका साकारत आहे. तिच्यासह या मालिकेत अभिनेता सुमीत पुसावळे प्रमुख भूमिकेत झळकत आहे.