Rupali Bhosale Reaction On Pathetic Road Condition : पावसाळ्यात मुंबई-ठाण्यातून प्रवास करताना नागरिकांना वाहतूक कोंडी, रस्त्यावरील खड्डे अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. गेल्या काही दिवसांत शशांक केतकर, जुई गडकरी अशा अनेक मराठी कलाकारांनी याविरोधात आवाज उठवून प्रवास करताना प्रचंड त्रास होत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्याचं पाहायला मिळालं. आता लोकप्रिय अभिनेत्री रुपाली भोसलेने घोडबंदर रोडच्या दयनीय अवस्थेचा व्हिडीओ शेअर केला आहे.
रुपाली भोसलेची नवीन मालिका ‘लपंडाव’ लवकरच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सुरू होणार आहे. यासाठी अभिनेत्रीला रोज घोडबंदर मार्गे प्रवास करून शूटिंगच्या सेटवर जावं लागतं. मात्र, रस्त्यावर प्रचंड खड्डे असल्याने अर्ध्या तासाच्या प्रवासाला रोज २ तास लागतात असं रुपालीने व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे. घोडबंदची रोडची अवस्था अतिशय वाईट, बेकार आणि पथेटिक असल्याचं रुपाली या व्हिडीओमध्ये सांगत आहे.
रुपाली भोसलेने शेअर केला व्हिडीओ
रुपाली म्हणते, “ज्या रस्त्यावरून घरी जाताना मला अर्धा तास लागतो तिथून प्रवास करताना मला २ तास लागत आहेत. याला रस्ता म्हणायचं का? काय अवस्था आहे या घोडबंदर रोडची… वाईट, बेकार, पथेटिक..! काय अवस्था आहे किती वर्ष झाली? किती वर्ष हा असा प्रवास करायचा? ५ वर्षे ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या वेळी मी विरारहून यायचे तेव्हा सुद्धा हे असंच होतं आणि आज सुद्धा तशीच अवस्था आहे. रात्रभर शूट करून पहाटे ५:३० वाजता घरी निघाले तर या घोडबंदरला आधी ट्राफिक मग हा सुंदर रस्ता… १२ ते १४ तास शूट मग २ तास हा असा प्रवास… कधी होणार हे नीट??”
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
दरम्यान, रुपालीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी देखील कमेंट्स करत तिच्या मताशी सहमती दर्शवली आहे. “ठाण्याचे रोड लडाख पेक्षा भयानक आहेत”, “घोडबंदर रोडचं कितीही काम करा..काहीच सुधारणा होणार नाहीये”, “हेच खरं वास्तव आहे”, “खरंच आम्हालाही असाच त्रास होतो प्रवास करताना” अशा कमेंट्स अभिनेत्रीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.