Rutuja Bagwe on marriage: पूर्वी मुलींना आई-वडील म्हणायचे की तुझं जेव्हा लग्न होईल, तू सासरी जाशील ते तुझं हक्काचं घर असेल. आता काळाप्रमाणे परिस्थिती बदलली आहे. मुली स्वत: काम करुन पैसे कमवतात. स्वत:ला हव्या असणाऱ्या गोष्टी स्वत:च्या पैशाने खरेदी करतात. इतकंच काय तर स्वत:चं हक्काचं घरदेखील खरेदी करतात. आता मुली आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्या आहेत. अनेक अभिनेत्रींनी अलीकडच्या काळात हक्काचे घर घेतल्याच्या गुड न्यूज दिल्या आहेत.
आता अभिनेत्री ऋतुजा बागवेने एका मुलाखतीत याबद्दल वक्तव्य केले आहे. तिने स्वत:च्या कमाईने स्वत:चे घर घेतले. विशेष म्हणजे, तिने कमी वयात स्वत:चे घर घेतले. यापाठीमागे तिचा काय विचार, याबद्दल अभिनेत्रीने खुलासा केला.
“आई नेहमी म्हणायची की…”
अभिनेत्री म्हणाली, “आई नेहमी म्हणायची की मुलीने स्वावलंबी असावं. स्वत:चं घर असावं. आर्थिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या इतक स्वावलंबी असावं की त्यासाठी लग्न करायची गरज नाही. तू लग्न यासाठी कर कारण- आयुष्यात एक योग्य जोडीदार असावाच लागतो. जीवनसाथी जे म्हणतात, तसा असावा. तुम्ही समान असलं पाहिजे. आधीपासून ते डोक्यात होतं.”
“मला असं वाटतं की माझी आई काळाच्या पुढे आहे. आधीपासूनच ती लग्न कर म्हणून माझ्या कधीच मागे लागली नाही. तू करिअर चांगलं कर, तू करिअरकडे लक्ष दे, असंच तिचं म्हणणं असायचं.”
“जेव्हा मी सहाय्यक भूमिका करण्यात मी रुळले होते. तेव्हा ती मला सांगायची की तुझ्यात नायिका होण्याची क्षमता आहे. तू तयार राहा. तू तयार असल्याशिवाय तुला काम मिळणार नाही. देव बघत असतो.मी स्वावलंबी असावं अशी आईची इच्छा होती. या सगळ्या विचारातून घर घेतलं. आता काही दिवसांपूर्वीच मी फुडचं पाऊल नावाचं रेस्टॉरंट सुरू केलं आहे.”
याच मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या गुंतवणूकीबाबतही खुलासा केला. ती म्हणाली, “असं म्हणतात की कमाईतील ४० टक्के बचत करावी आणि ६० टक्के वापरावे. तर मी याउलट करते. मी माझ्या कमाईतील ४० टक्के वापरते आणि ६० टक्के बचत करते. “
ऋतुजा असेही म्हणाली की मी आधीपासूनच खूप खर्च करत नाही. जेव्हा मी एकांकिका स्पर्धा जिंकायला लागले. तर त्यातीलसुद्धा काही पैसे मी काढून ठेवायचे. मग जेव्हा जेव्हा, जसे जसे पैसे मिळायचे तेव्हा मी गुंतवणूक करत गेले.
दरम्यान, अभिनेत्रीने फक्त मालिकांमधूनच प्रेक्षकांचे मनोरंजन केले नाही, तर मालिकासंह नाटक, वेबसीरिज, चित्रपटांमध्येदेखील काम करताना दिसली आहे.