Saath Nibhaana Saathiya Fame Gia Manek Wedding : ‘साथ निभाना साथिया’ या लोकप्रिय मालिकेत गोपी बहूची भूमिका साकारत घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री जिया मानेक नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांसह शेअर केली आहे.

हिंदी टेलिव्हिजनवरील एकेकाळी गाजलेली मालिका ‘साथ निभाना साथिया’मध्ये जियाने गोपी बहू ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत तिच्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात जणू घर केलं. आजही लोक तिला यातील तिच्या भूमिकेसाठी ओळखतात. अशातच आता प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री जियाने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंदाची बातमी दिली आहे. जिया खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकली आहे. तिने अभिनेता वरुण जैनसह लग्न केलं आहे.

नुकतेच दोघांनी एकमेकांबरोबरचे लग्नाच्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमधून त्यांनी फार गाजावाजा न करता साध्या पद्धतीने लग्न केल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टला जियाने खास कॅप्शनही दिलं आहे.

लग्नाबद्दल जिया मानेकची प्रतिक्रिया

जियाने दिलेल्या कॅप्शनमध्ये तिने म्हटलं की, “आम्ही आमच्या आयुष्यातील खूप महत्त्वाच्या टप्प्यात पदार्पण केलं आहे. पूर्वी आम्ही दोघे मित्र होतो आणि आता आम्ही नवरा बायको झालो आहोत. आमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांच्या शुभेच्छा व आशीर्वादासाठी आम्ही कृतज्ञ आहोत.” पुढे तिने मिस्टर अँड मिसेस जिया आणि वरुण असं लिहिलं आहे.

जियाचा नवरा अभिनेता वरुण जैन हा देखील हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने ‘दिया और बाती हम’, ‘गुम हैं किसी के प्यार में’, ‘पेहरेदार पिया की’, ‘संध्या’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. यासह त्याने ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’, ‘भूल चूक माफ’, ‘इश्क विश्क रीबाउंड’ यांसारख्या चित्रपटांतही काम केलं आहे.

दरम्यान, जियाबद्दल बोलायचं झालं तर ती खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आली ते ‘स्टार प्लस’वरील ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेमुळे. २०१० साली सुरू झालेल्या या मालिकेने तब्बल ७ वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. यामध्ये जियाने साकारलेलं गोपी बहूचं पात्र त्याकाळी खूप गाजलेलं. परंतु, पुढे काही कारणांनी तिने या मालिकेतून एक्झिट घेतली. यानंतर तिने ‘सब टीव्ही’वरील ‘जिनी और जुजू’ (Jeannie Aur Juju) यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली.