कलर्स मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील अभ्या आणि लतिकाची जोडीही प्रेक्षकांची आवडती होती. या मालिकेत अभ्या ही भूमिका अभिनेता समीर परांजपेने साकारली होती. समीरला या मालिकेतुन अधिक प्रसिद्धी मिळाली. अभिनेता असण्याबरोबरच समीर एक उत्तम गायकही आहे. या मालिकेनंतर त्याने कलर्स मराठीच्याच ‘सुर नवा, ध्यास नवा’ या गाण्याच्या शोमध्ये सहभाग घेतला होता.

‘सुर नवा, ध्यास नवा’ या गाण्याच्या शोमधून अभिनेता समीर परांजपेची गायकी प्रेक्षकांनी अनुभवली. या शोमधील समीरची अनेक गाण्यांना रसिकांनी तसंच परीक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. सध्या समीर स्टार प्रवाहच्या ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत त्याच्याबरोबर अभिनेत्री शिवानी सुर्वेही आहे. स्टार प्रवाहची ही नवी जोडीही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेमधील तेजस आणि मानसीमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावते. या मालिकेतील समीरच्या तेजस या भूमिकेलाही प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. समीर सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असतो. स्वत:चे फोटो-व्हिडीओ तसंच मालिकेबद्दलचे अनेक अपडेट्स तो शेअर करत असतो. अशातच त्याने सीनसाठी एक गाणं गायलं असून हे गाणं त्याच्यावरच चित्रीत झाल्यानिमित्तचा आनंद त्याने व्यक्त केला आहे.

समीरने ‘तोच चंद्रमा नभात’ या गाण्याची स्वत: गायलेल्या गाण्याची पूर्ण झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे आणि असं म्हटलं, “आनंद म्हणजे काय तर… आपल्यावर चित्रित होणाऱ्या गाण्याला आपलाच आवाज असणं. ही भावना फार कमाल आहे. त्यातही मालिका माध्यमात जिथे ५ सेकंदही प्रेक्षक कंटाळून मालिका सोडून जाऊ नये यासाठी कथेची, ब्रेक्स टायमिंगची मांडणी केली जाते, तिथे ३ कडव्यांच पूर्ण गाणं आपल्या वाट्याला यावं यासारखी मजा नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, समीरने गायलेल्या या गाण्याचं त्याच्या चाहत्यांनी कौतुक केलं आहे. “अंगावर काटा आला राव”, “किती गोड आवाज आहे तुमचा”, “हे गाणं अगदी हृदयस्पर्शी आहे”, “तुमचा भावपूर्ण आवाज गाण्याला खूप शोभला” अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत. तसंच अनेक चाहत्यांनी समीरने हे गाणं याआधी गोठ या मालिकेत गायल्याचीदेखील आठवण सांगितली आहे.