Sankarshan Karhade Shares Emotional Post : लेखक, कवी, सूत्रसंचालक व अभिनेता म्हणून लोकप्रिय असलेला कलाकार म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. नाटक, मालिका, सिनेमे या तीनही माध्यमांतून त्याने आपल्या कलेची चुणूक दाखवून दिली आहे. मनोरंजन क्षेत्रात सक्रिय असणारा संकर्षण सोशल मीडियावरसुद्धा तितकाच सक्रिय असतो.
संकर्षण सोशल मीडियाद्वारे तो त्याच्या आयुष्यातील काही खास घटना, प्रसंग किंवा काही आठवणी शेअर करीत असतो. अशातच त्याने सोशल मीडियाद्वारे एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. संकर्षणने लिहिलेल्या पहिल्या नाटकाचा नुकताच शेवटचा प्रयोग झाला आणि त्यानिमित्त अभिनेत्याने भावूक पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये संकर्षण म्हणतो, “काल (२४ ऑगस्ट) बालगंधर्व रंगमंदिर, पुणे इथे ‘तू म्हणशील तसं’ नाटकाचा शेवटचा प्रयोग पार पडला. प्रेक्षकांनी नाटकाला ‘हाऊसफुल्ल’ निरोप दिला. त्या निमित्ताने काही लिहिलंय; ते शेअर करतो. कसं वाटतंय सांगा.” त्यानंतर संकर्षणने नाटकाला निरोप देतानाच्या भावना कविता स्वरूपात शेअर केल्या आहेत. त्याची ही कविता अशी आहे की,
माझ्यातल्या लेखकाचं दोन हजार चौदाला लगीन झालं
‘लेखणी’ नावाच्या बायकोपासून, मला हे पहिलं बाळ झालंम्हणलं नाव असं ठेऊ, की होणार नाही हसं
सर्वानुमते ठरलं मग, ‘तू म्हणशील तसं’…कलाकृतीचा बाप होऊन, या क्षेत्रात थोडीच भागतं?
निर्माता नावाच्या काकाकडे, त्याला दत्तक द्यावं लागतं…चांगला काका शोधण्याचे, सगळे प्रयत्न संपले,
अचानक काका मिळाले हो… ‘प्रशांत दामले…’मग ‘प्रसाद’ नावाच्या मास्तराला, संस्कारांसाठी बोलावलं,
सगळ्यांनी मिळून हे बाळ चांगलं ४५० प्रयोग चालवलं…’पण आज मात्रं बापाचं काळीज, आतून खूप हाललंय,
माझं पहिलं बाळ मला सोडून, लांब कुठेतरी चाललंय..नाटकाला गच्चं पकडून ठेवावं, असं होत नसतं हो…
प्रत्येक जीवाप्रमाणे नाटकाचंही, ठरलेलं आयुष्यं असतं हो…एक विनंती तुम्हाला करतो, समजून घ्याल का?
या कलाकृतीला) तुमच्या, मनात जिवंत ठेवाल का…?आग्रह नाही हं मुळी, वाटलं तर ठेवा बरं,
मोबदला म्हणून तुम्हाला, देतो वचन खरं…‘तथास्तु’ म्हणा या वाक्याला, जे पुढे आता बोलीन
लेखणीसोबतच्या संसारात पुढेही, चांगली पोरं जन्माला घालीन…
दरम्यान, या पोस्टमध्ये पुढे त्याने प्रशांत दामले, प्रसाद ओकसह मंचावरील आणि मंचामागील कलाकार आणि प्रयोगाला आलेल्या प्रत्येक प्रेक्षकाचे आभार मानले आहेत.
संकर्षणच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर सध्या त्याचे रंगभूमीवर ‘कुटुंब किर्रतन’ हे नाटक सुरू आहे. त्याच्या या नाटकाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. त्याशिवाय तो झी मराठीवरील ‘आम्ही सारे खवय्ये २’मधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.