‘सरस्वतीचंद्र’, ‘पांड्या स्टोअर’ सारख्या मालिकांमध्ये काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे शायनी दोषी होय. शायनीसाठी अभिनयविश्वात करिअर करणं अजिबात सोपं नव्हतं, कारण घरातूनच विरोध होता. शायनीला डॉक्टर व्हायचं होतं, पण आईच्या इच्छेखातर ती अभिनेत्री झाली.
शायनीने सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत अनेक आश्चर्यचकित करणारे खुलासे केले आहेत. तिचे वडील आईला कसा त्रास द्यायचे, ते तिने सांगितलं. इतकंच नाही तर वडील आईला मारायचे आणि तिच्यासाठी अपशब्द वापरायचे, असंही शायनी म्हणाली.
‘सरस्वतीचंद्र’ मधून केलं पदार्पण
“मी २०१२ मध्ये मुंबईत आले आणि माझा पहिला शो ‘सरस्वतीचंद्र’ होता जो संजय लीला भन्साळींचा शो होता. या इंडस्ट्रीत येण्यामागे माझ्याकडे इतरही अनेक कारणं होती. बाबांनी आम्हाला सोडलं होतं, त्यामुळे मला माझ्या शाळेची फी, कॉलेजची फी आम्हाला भरावी लागत होती. त्यावेळी माझा खर्च उचलू शकणारं होणी नव्हतं, त्यामुळे मलाच मुलाप्रमाणे सगळी जबाबदारी घ्यावी लागली,” असं शायनी म्हणाली.
शायनीने १६ व्या वर्षी मॉडेलिंग करणं सुरू केलं होतं. तिने अभिनय करावा अशी तिच्या आईची इच्छा होती, त्यामुळे ती अहमदाबादहून मुंबईला ऑडिशन द्यायला यायची आणि परत जायची. ६-७ ऑडिशननंतर ती झी च्या एका शोसाठी ऑडिशन द्यायला गेली होती. तिथे स्टार प्लसच्या एका व्यक्तीने शायनीला पाहिलं आणि तिच्याबद्दल आईला विचारणा केली. त्याने तिच्या आईला कार्ड दिलं आणि दुसऱ्या दिवशी भेटायला बोलावलं. शायनी तिथे गेल्यावर तिला समजलं की तो संजय लीला भन्सालींचा शो आहे. त्यांनी ऑफर दिली आणि शायनीने ती स्वीकारली.
कुटुंबातील लोक शायनीला म्हणायचे वेश्या
शायनी इंडस्ट्रीमध्ये आली तेव्हा तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. वडिलांच्या बाजूच्या सर्व नातेवाईकांनी तिच्या आईशी संबंध तोडले होते. अभिनेत्री म्हणाली, “मी एका रूढीवादी गुजराती कुटुंबातून आले होते. त्या कुटुंबात कलाकार असलेल्या लोकांकडे तुच्छतेने पाहिलं जातं. कलाकार असेच असतात, ही अभिनेत्री आहे तर वेश्या असेल, ही मॉडेलिंग करते तर वेश्या असेल, पण माझा शो आल्यानंतर हे लोक गप्पा बसले.”
शायनीला आले वाईट अनुभव
शायनीनं मुलाखतीत सांगितलं की तिच्या पालकांनी १६ वर्षे तिला एकत्र वाढवलं, परंतु त्यानंतर त्यांच्यात खूप मतभेद झाले, ज्यामुळे ते वेगळे झाले. दोघांनी बराच काळ या गोष्टी आपल्यापासून लपवल्या. आई घर चालवण्यासाठी अनेकदा तिचं सोनं विकायची. एकदा शायनीला फी न भरल्यामुळे कॉलेजमधून काढून टाकण्यात आलं होतं, तेव्हाही आईने दागिने विकून फी भरली होती.
आईला मारायचे वडील
शायनीच्या आईला तिचे वडील मारायचे. “माझ्या आईला ते लाथा मारायचे. आईला खूप मारहाण झालीये. मी हे सगळं पाहून घाबरायचे आणि स्वतःला खोलीत कोंडून घ्यायचे कारण मला तिला मार खातना पाहणं बरोबर वाटत नव्हतं. माझं बालपण खूप वाईट होतं,” असं शायनी म्हणाली.
जे नातेवाईक ‘वेश्या’ म्हणायचे त्यांना तिच्या वडिलांनी सुनावलं होतं का? असं विचारल्यावर शायनी म्हणाली, “मला माझे वडीलच वेश्या म्हणायचे. आईशी भांडण झालं की ते माझ्यासाठी तोच शब्द वापराये. शूटिंगला गेल्यावर बरेचदा उशीर व्हायचा, आई माझ्याबरोबरच असायची. आम्ही मध्यरात्री ३ वाजता घरी यायचो. तेव्हा ते अपशब्द वापरायचे. मुलीला घेऊन रात्री ३-३ वाजेपर्यंत कुठे जातेस, तिला वेश्या व्यवसाय करायला नेतेस का? असं बोलायचे. त्यांची भाषा गलिच्छ होती.”