Satvya Mulichi Satavi Mulgi Serial Fame Actress New Home : स्वत:चं घर असणे हे प्रत्येकाच्या बकेट लिस्टमधील एक इच्छा असते आणि हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने मेहनतही घेत असतो. गेल्या काही महिन्यांत मराठी मनोरंजन सृष्टीतील काही कलाकारांनी नवीन घर घेत स्वप्नपूर्ती केली. याची खास झलकही त्यांनी सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे.
अशातच मराठी अभिनेता प्रणव रावराणेने नुकतंच स्वत:चं नवं घर घेतलं आहे. या नव्या घराबद्दल सोशल मीडियावर त्याचे मित्रमंडळी कौतुक करत आहेत. प्रणव हा मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आजवर अनेक मालिका, रिअॅलिटी शो तसंच चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा प्रणव सोशल मीडियावर सुद्धा तितकाच सक्रीय असतो. सोशल मीडियाद्वारे तो त्याचे अनेक फोटो व कामासंबंधित माहिती शेअर करत असतो. अशातच त्याला मित्राने नव्या घरानिमित्त भेटवस्तू दिली असून ही पोस्ट त्याने आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.
प्रणवसह त्याची पत्नीसुद्धा मनोरंजन क्षेत्रात आहे. अमृता रावराणे असं तिचं नाव असून तीसुद्धा एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. झी मराठीवरील गाजलेल्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. अमृताने सुद्धा तिच्या इन्स्टाग्रामवरील स्टोरीवर नव्या घराच्या पूजेची खास झलक दाखवली आहे.
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील तिची सहअभिनेत्री श्वेता मेहंदळेनेसुद्धा अमृताला नव्या घरानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. श्वेताने तिच्या सोशल मीडियावर प्रणव-अमृता यांच्याबरोबरचा खास फोटो शेअर करत ‘नव्या घरासाठी शुभेच्छा’ असं म्हटलं आहे. प्रणव-अमृता हे दोघे मनोरंजन क्षेत्रात सक्रीय असून कष्टाने दोघांनी त्यांच्या नव्या घराचं स्वप्न साकार केलं आहे. त्यामुळे दोघांवर सध्या अनेकांकडून कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.


प्रणवच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘दुनियादारी’ या गाजलेल्या सिनेमातल्या ‘सॉरी’ भूमिकेमुळं तो चांगलाच लोकप्रिय झाला. ‘हास्यसम्राट’ या शोचा तो विजेताही होता. यानंतर त्यानं अनेक सिनेमांमध्ये सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिका साकारल्या. तसंच अभिनेता ‘प्रितम’, ‘वन मिस कॉल’, ‘गुगल आई’, ‘पिकोलो’, ‘गेमाडपंथी’, ‘जिलबी’ अशा अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
प्रणवसह त्याची पत्नी अमृतासुद्धा छोट्या पडद्यावरील एक नावाजलेले नाव आहे. ‘माझे मन तुझे झाले’ या मालिकेतील ‘स्वामिनी’ ही अमृताने साकारलेली व्यक्तिरेखा लोकप्रिय झाली आहे. यानंतर तिने काही मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मध्यंतरी तिने काही काळ ब्रेक घेतला होता. या ब्रेकनंतर तिने ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतून पुन्हा कमबॅक केलं.