Savalyachi Janu Savali Upcoming Twist: सावली व सारंग यांच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या जोडीने त्यांच्या प्रेमळ स्वभावाने, एकमेकांप्रति असलेल्या आदराने, तसेच कुटुंबाप्रति असलेली काळजी, आस्था यांमुळे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

त्याबरोबरच सारंग व सावली ज्या पद्धतीने एकमेकांना साथ देतात, त्यामुळेदेखील ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे

सारंग व सावली एकमेकांना साथ देत असले तरी सारंगच्या घरातील काही व्यक्ती सावलीला त्रास देण्यासाठी कट-कारस्थान करताना दिसतात. ऐश्वर्याला सावली घरात नको, असे वाटते. कारण- ती गरीब घरची, सावळ्या रंगाची आहे. त्यामुळे तिला घरातून बाहेर काढण्यासाठी ती सातत्याने प्रयत्न करते.

त्याबरोबरच तारादेखील आता सावलीविरुद्ध कारस्थान करताना दिसत आहे. तारा ही भैरवी वझेची मुलगी आहे. सावली तारासाठी गाणे गाते आणि तारा गाणे म्हणत असल्याचा अभिनय करते. हे वर्षानुवर्षे चालत आले आहे. भैरवी त्या बदल्यात सावलीच्या घरच्यांना आर्थिक स्वरूपात मदत करते. ती अनेकदा सावली व तिच्या घरच्यांना त्रासही देते.

सावली भैरवीप्रति असलेल्या आदरामुळे अनेकदा तिचा अन्याय, अत्याचार सहन करते. काही वेळा तिला प्रत्युत्तर देते. काही महिन्यांपूर्वी तारा व सारंगचा लहान भाऊ सोहमचे लग्न झाले आहे. लग्न झाल्यानंतर तारासुद्धा मेहेंदळेंच्या कुटुंबात सून म्हणून आली आहे. मात्र, ती सतत ऐश्वर्याबरोबर सावलीला त्रास देताना दिसते.

तारा कोणती चूक करणार?

झी मराठी वाहिनीने सावळ्याची जणू सावली मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, एका सार्वजनिक ठिकाणी काही चाहते ताराला गाण्याच्या काही ओळी गाण्याचा आग्रह करतात. यावेळी चाहते मोबाईलमध्ये ताराचा व्हिडीओदेखील रेकॉर्ड करीत असतात. ती म्हणते की, मी आता गाऊ शकत नाही. त्यानंतरदेखील तिचे चाहते दोन ओळी गाण्याचा आग्रह करतात; मात्र ताराला गाणे गाताच येत नसल्याने तिचा संताप होतो. ती संतापाने एकाचा मोबाईल खाली फेकते आणि म्हणते की, मला गाणं गाता येत नाही. मूर्ख कुठले, इथून निघा. त्यानंतर ती निघून जाते.

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, सारंग व सोहमशी तिलोत्तमा बोलत आहे. ती त्यांना सांगते की, आपण हेच गाणे रेकॉर्ड करूयात आणि सगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल करूयात. त्यानंतर तारा सावलीकडे विनवणी करीत असल्याचे दिसत आहे. ती म्हणते की, सावली प्लीज मला वाचव. त्यावर सावली तिला म्हणते की, आपल्याला जगन्नाथजींची मदत घ्यावी लागेल.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘सावली ताराच्या मदतीला धावून जाईल का?’, अशी कॅप्शन दिली आहे. आता मालिकेत पुढे काय होणार, सावली ताराची कशी मदत करणार की ताराचे सत्य सर्वांसमोर येणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.