Zee Marathi Serial Savlyachi Janu Savali Promo : ‘झी मराठी’च्या ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेतील संपूर्ण मेहेंदळे कुटुंबीय दर्श अमावस्येला दिवे लावण्यासाठी मंदिरात जात असल्याचं पाहायला मिळणार आहे. हे संपूर्ण नियोजन तिलोत्तमाने केलेलं असतं. मात्र, याचदरम्यान सगळ्यात मोठा खुलासा होणार आहे. सारंगसमोर उघड होणारं सत्य नेमकं काय आहे जाणून घेऊयात…

‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेतील मुख्य नायिका सावली सर्वांच्या मनाविरुद्ध तिलोत्तमाच्या घरची सून होते. पती सारंगनेही तिचा स्वीकार केलेला नसतो. पण, या दोघांचं एक विशेष नातं असतं याबद्दल सारंग अनभिज्ञ असतो. सारंगला अंधाराची प्रचंड भीती वाटत असते. अंधारात एकटा गेल्यावर तो पूर्णपणे बिथरून जातो आणि त्याच क्षणाला वेळोवेळी सावलीने त्याला मदत केलेली असते. यापूर्वी लग्नाआधी सुद्धा सावलीने सारंगचे प्राण वाचवलेले असतात. त्यावेळी ती मुलगी सावलीच आहे हे सारंगला माहिती नसतं पण, तिचा हात पकडल्याने तो स्पर्श सारंगला अचूक आठवत असतो.

तिलोत्तमा मंदिरात जायला निघते, तेव्हा सावलीला बरोबर घेऊन जाण्यास ती स्पष्ट नकार देते. याचवेळी मेहेंदळेंच्या घरी जगन्नाथ येतो तो तिलोत्तमाला सांगतो, “आज कुणी कुठेही जाऊ नका, सारंगच्या आयुष्यात धोका निर्माण होऊ शकतो.” पण, तिलोत्तमा हे सांगण्याचा तुला काहीच अधिकार नाहीये असं सांगत त्याला धुडकावून लावते. यावर जगन्नाथ म्हणतो, “हे बघ सारंग सावली तुझी आयुष्यरेखा आहे.”

तरीही तिलोत्तमा कोणाचंही न ऐकता सावलीला घरीच ठेवून मंदिरात जायला निघते. मंदिरात पोहोचल्यावर सगळे पूजेला बसतात आणि दुसरीकडे सारंग अंधारात एकटाच दिवे लावण्यासाठी जातो.

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा २० जुलैला महाएपिसोड

जगन्नाथने दिलेल्या संकेतानुसार सारंग पुन्हा एकदा बिथरतो आणि सावली वेळीच येऊन त्याला आधार देते. सारंग तिला म्हणतो, “ज्या व्यक्तीने नेहमी मला अंधारात सांभाळलं ती व्यक्ती तू होतीस…” यानंतर सारंग बायकोला मिठीत घेतो. आता सारंगच्या आयुष्यात सावली किती महत्त्वाची आहे, हे संपूर्ण जगाला समजणार आहे. तिलोत्तमा देखील या सत्याचा उलगडा झाल्यावर चक्रावून जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सारंगसमोर अखेर सत्य उघड झाल्याने प्रेक्षक कमेंट्समध्ये आनंद व्यक्त करत आहेत. हा विशेष भाग २० जुलैला रविवारी दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता प्रसारित केला जाईल.