‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका सध्या एका अनोख्या स्पर्धेमुळे चर्चेत आली आहे. या मालिकेत लवकरच मेहेंदळेंच्या घरची सर्वोत्कृष्ट सून कोण होणार? याची स्पर्धा रंगणार आहे. मालिकेत नेमका काय ट्विस्ट येणार, सावली स्वत:साठी एक ठाम निर्णय घेणार आहे तो कोणता असेल? याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेमध्ये तारा आणि सावलीच्या संघर्षाने एक नवं वळण घेतलं आहे. घरात सुरू झालेल्या वर्चस्वाच्या लढाईत सावलीला खूप आव्हानांना सामोर जावं लागत आहे. तर, तारा आपल्या सत्तेचं साम्राज्य कायम राखण्यासाठी सतत नवनवीन डावपेच आखत आहे. तिचं वर्चस्व टिकवण्यासाठी, ती सावलीला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतेय.
आता ‘सर्वोत्कृष्ट सून’ म्हणून श्रेष्ठता सिद्ध करण्यासाठी तारा घरात ‘बेस्ट सून’ स्पर्धा आयोजित करण्याचा प्लॅन आखते. ही स्पर्धा फक्त कामगिरीची नसून, ती भावना, परंपरा आणि मानसिक ताकदीची परीक्षा असणार आहे.
यादरम्यान, असा एक क्षण येतो जिथे तारा सावलीकडे गाणं गाण्याची मागणी करते. कारण, नियमांनुसार सावलीने तिचा आवाज ताराच्या आईकडे गहाण ठेवलेला असतो. परंतु, सावली पहिल्यांदाचा मोठा निर्णय घेत ताराला नकार देईल.
तारासाठी गाणं गाण्यास सावली नकार देते आणि तिच्या आत्मसन्मानावर पहिल्यांदाच ठाम राहते. या कृत्यामुळे तारा आणि सावलीच्या संघर्षात आणखी तणाव निर्माण होणार आहे आणि याचे पडसाद कुटुंबात देखील उमटतील.
सर्वोत्कृष्ट सून’ म्हणून श्रेष्ठता सिद्ध करण्यासाठीची ही स्पर्धा प्रेम, प्रतिष्ठा आणि घराचा ताबा या सगळ्या अनुषंगाने असेल. सावली मोठ्या धैर्याने या परीक्षेला समोरी जाणार आहे. यामुळे घरातील सदस्य सुद्धा चकीत होतात. आता या स्पर्धेत कोण बाजी मारणार? कपटीपणा करणाऱ्या तारावर कायमस्वरुपी मात करण्यात सावली यशस्वी ठरेल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
दरम्यान, अभिनेत्री प्राप्ती रेडकरची प्रमुख भूमिका असलेली ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका दररोज संध्याकाळी ७ वाजता ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रसारित केली जाते. यामध्ये प्राप्तीसह अभिनेता साईंकित कामत, मेघा धाडे, सुलेखा तळवलकर, भाग्यश्री दळवी हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.