Zee Marathi Savlyachi Janu Savali Promo : ‘झी मराठी’ वाहिनीच्या ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत नुकतीच एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झालेली आहे. ‘शिवा’ मालिका संपल्यावर त्यामध्ये बाई आजीची भूमिका साकारणाऱ्या लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर आता ‘सावळ्याची जणू सावली’मध्ये मेहेंदळेंच्या घरी ‘जगदंबा’ होऊन आल्या आहेत.
चंद्रकांत मेहेंदळेंची ( सारंगचे बाबा ) आत्या म्हणून ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री सविता मालपेकरांनी एन्ट्री घेतली आहे. त्या घरात येताच सगळ्यांना मी लवकरच सूतासारखं सरळ करणार असं ठामपणे सांगतात. जगदंबा आजीला पाहून तारा, ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले दिसतात. ऐश्वर्या गुपचूप खोलीत जाऊन म्हणते, “यांना यांची मुलं सांभाळत नाहीत म्हणून आपल्याकडे आल्या आहेत” आता सासूबाई तिलोत्तमाच्या अनुपस्थितीमध्ये जगदंबा आजीचा पाहुणचार कोण करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आजी घरात आल्यावर मेहेंदळे कुटुंबातील संपूर्ण वातावारण बदलून गेलं आहे. अशातच जगदंबा सोहमच्या रुममध्ये जाते, आजी येतेय याची चाहूल लागताच सोहम सर्वात आधी ताराला लपायला सांगतो. तारा बेडरुममधील एका कोपऱ्यात लपते. पुढे, सोहम तिच्यावर कपाटातील सगळे कपडे टाकतो आणि त्याच्या आत तारा दडून बसलेली असते. आता जगदंबा आजी फारच हुशार असल्याने तिला ताराची खेळी बरोबर समजते. ती घरातील एका मदतनीसाला काठी आणायला सांगते. आता आजी ताराला चांगलीच अद्दल घडवून तिला फटके देणार का? मालिकेत पुढे काय घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत.
दुसरीकडे अमृता सावलीला फोन करते आणि घरी निर्माण झालेल्या परिस्थितीची कल्पना देते. यावर सावली म्हणते, “मी नक्की येईन शेवटी काही झालं तरी आजींना त्यांच्या आवडीचं जेवण मिळायलाच पाहिजे.”
दरम्यान, सविता मालपेकर यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर आजवर त्यांनी अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय ‘मुळशी पॅटर्न’, ‘पांडू’, ‘काकस्पर्श’ अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं आहे. आता ‘शिवा’ मालिका संपल्यावर त्या ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत.