Shantanu Moghe Shared An Emotional Post : प्रिया मराठे व शंतनू मोघे ही मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी होती. परंतु, दुर्दैवानं एक महिन्यापूर्वी प्रियाचं कर्करोगामुळे निधन झालं. अनेक दिवसांपासून ती या त्रासातून जात होती. यावेळी तिला तिच्या कुटुंबाची, इंडस्ट्रीतील कलाकार मित्र-मैत्रिणींची खूप साथ लाभली. तिचा पती व अभिनेता शंतनू मोघेने तिला या काळात खंबीर साथ दिली. अशातच आता प्रियाच्या आठवणीत शंतनूने पहिल्यांदाच तिच्या निधनाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अभिनेत्री प्रिया मराठेचं ३१ ऑग्स्ट रोजी निधन झालं. त्यावेळी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर तिच्याबरोबरचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करीत हळहळ व्यक्त केली. मात्र, शंतनू मोघेने त्यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पत्नीच्या जाण्यानं त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला परंतु, त्यामधून स्वत:ला सावरत, तो पुन्हा कामावर रुजू झाल्याचं पाहायला मिळालं.
प्रिया मराठेच्या आठवणीत शंतनू मोघे भावुक
शंतनू मोघेने अशातच आता प्रियाला हे जग सोडून जाऊन एक महिना झाल्यानं तिच्या आठवणीत एक पोस्ट शेअर करीत तिच्याबरोबरचे काही गोड फोटो शेअर केले आहेत. यावेळी त्याने पोस्टला मोठी कॅप्शन देत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रियाबरोबरचे फोटो शेअर करीत त्याने म्हटलं, “ही खूप खास पोस्ट आहे. मला सगळ्यांचे आभार मानायचे आहेत; ज्यांनी व्हॉट्सॲप, मेल, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या विविध प्लॅटफॉर्मवरून प्रियाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. त्यासाठी मी मित्र-मैत्रिणी, कुटुंबीय आणि सगळ्या चाहत्यांचा खूप आभारी आहे.”
शंतनू मोघे पुढे म्हणाला की, “आज एक महिना झाला; पण हे वैयक्तिक दु:ख शब्दांत मांडता न येण्यासारखं आहे. प्रियाचं जाणं खूप अनपेक्षित, त्रासदायक, अयोग्य व दु:खद होतं. तिच्या जाण्यानं आपल्या सगळ्यांना खूप दु:ख झालं. पण, तिनं तिच्या प्रेमळ, समजूतदार स्वभावानं अनेकांची मनं जिंकली होती. या कठीण काळात आमच्याबरोबर खंबीरपणे उभं राहिल्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद!
शंतनू मोघे देवाला उद्देशून म्हणाला, “देवा तिची काळजी घे, तिच्यावर प्रेम कर आणि जर कुठलीही चुक झाली तर तुला माफ करणार नाही.” शेवटी प्रियाला उद्देशून त्याने लिहिले माय ऐंजल पुन्हा भेटू…. असं म्हणत या पोस्टमधून शंतनूने पहिल्यांदाच प्रियाच्या निधनाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
प्रियाच्या निधनानंतर काही दिवसांनी शंतनू मोघेने काम करायला सुरुवात केली. सध्या तो ‘स्टार प्रवाह’वरील ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत मंजिरीचा मोठा भाऊ शंतनू या भूमिकेतून झळकत आहे.