Sharmishtha Raut On Marathi Serial : ‘उंच माझा झोका’, ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकांमधून अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत घराघरांत लोकप्रिय झाली. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या काही वर्षांत शर्मिष्ठाने निर्माती म्हणून मनोरंजन विश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘नवरी मिळे हिटलरला’ अशा लोकप्रिय मालिकांची निर्माती म्हणून ती ओळखली जाते.

आजच्या घडीला शर्मिष्ठाने सर्वत्र वेगळी ओळख निर्माण केलेली असली, तरी एक काळ असा होता जेव्हा तिला इंडस्ट्रीत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. याबद्दल अभिनेत्रीने ‘लोकशाही’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. २००९ मध्ये प्रसारित होणाऱ्या ‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेमुळे शर्मिष्ठाला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. मात्र, या मालिकेत निगेटिव्ह लीड भूमिका मिळण्याआधी तिला याच मालिकेसाठी ५ वेळा रिजेक्ट करण्यात आलं होतं. हा किस्सा नेमका काय आहे पाहुयात…

शर्मिष्ठा राऊत म्हणाली, “२००८ मध्ये मला इंडस्ट्रीत काम करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर २००९ मध्ये मला ‘मन उधाण वाऱ्याचे’ ही मालिका मिळाली. त्या मालिकेतील निगेटिव्ह लीड भूमिका रिप्लेस होणार होती. मला अभिजीत केळकरने सांगितलं होतं की, ‘तू तिथे जा आणि ऑडिशन दे’ मी तेव्हा त्याला बोलले की, अरे ‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेतील छोट्या-छोट्या भूमिकांसाठी मी पाच वेळा ऑडिशन दिल्या आहेत आणि रिजेक्ट झाले आहे.”

५ वेळा रिजेक्ट झाले – शर्मिष्ठा राऊत

“माझं असं झालं छोट्या-मोठ्या भूमिकांसाठी मी पाच वेळा रिजेक्ट झालेय तर निगेटिव्ह लीडसाठी कसं सिलेक्शन होईल? तर तो माझ्या मागेच लागला होता…त्याने खूप पाठपुरावा केला. त्याने तिथेही सांगितलं होतं तुम्हाला जशी हवीये तशी ती आहे, एकदम फुल ऑफ एनर्जी आहे…चांगलं काम करेल. त्याचं ऐकून मी त्या ऑडिशनसाठी गेले होते. माझा नंबर होता १६९…ती रिप्लेसमेंटची भूमिका असूनही खूप मुली ऑडिशनसाठी येऊन गेल्या होत्या.”

अभिनेत्री पुढे म्हणाली, “ऑडिशनसाठी माझा नंबर शेवटचा होता…आत गेल्यावर माझा एक लूक घेतला आणि दुसऱ्या लूकसाठी पाठवलं. संध्याकाळी ७-७.३० ची वेळ होती…मला त्या हेअर ड्रेसर बोलल्या होत्या की, तुला दुसरा लूक पण सांगितलाय म्हणजे तुझी कदाचित या भूमिकेसाठी निवड झालीये. मी विचार केला अरे पाच छोट्या-मोठ्या भूमिकांसाठी रिजेक्ट झालेय…तर निगेटिव्ह लीड कशी मिळेल. मला तेव्हा महेश कोठारे सर भेटले…त्यांची निर्माते म्हणून ‘मन उधाण वाऱ्याचे’ ही पहिली मालिका होती. त्यांना ऑडिशनमध्ये माझं काम आवडलं होतं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“महेश सरांना मी सगळी कल्पना दिली पाच वेळा रिजेक्ट झालेय वगैरे हे सुद्धा सांगितलं होतं. कारण, मला वाटलंच नव्हतं की मी सिलेक्ट होईन. मला दोन दिवसांनी फोन आला की तुमची निवड झालीये…आणि आधी वेगवेगळ्या भूमिकांसाठी रिजेक्ट झाल्यावर मला थेट निगेटिव्ह लीडची भूमिका मिळाली असं सगळं नशीब बदललं.” असं शर्मिष्ठाने सांगितलं.