Sharmishtha Raut Baby Girl : शर्मिष्ठा राऊत तिच्या दमदार अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांचं मन जिंकून घेते. आजवर तिने अनेक मालिका व चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. सध्या अभिनेत्री लोकप्रिय मालिकांची निर्माती म्हणून देखील जबाबदारी सांभाळताना दिसतेय. यंदा एप्रिल महिन्यात शर्मिष्ठाच्या गोंडस लेकीचं बारसं थाटामाटात पार पडलं होतं. लग्नानंतर साडेचार वर्षांनी अभिनेत्री आई झाली आहे. आता शर्मिष्ठा आपल्या चिमुकल्या लेकीचा चेहरा चाहत्यांना कधी दाखवणार याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते. अखेर गणेशोत्सवात बाप्पाचं आणि गौरीचं आगमन झाल्यावर शर्मिष्ठाने लेकीची पहिली झलक माध्यमांना दाखवली आहे.
‘राजश्री मराठी’ने शर्मिष्ठा राऊतच्या मुलीची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री तिच्या चाहत्यांना ‘ही आमची रुंजी’ अशी लेकीची ओळख करून देत असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीकडे नुकतंच नवसाच्या महालक्ष्मींचं आगमन झालं आहे. यानिमित्ताने शर्मिष्ठाने घरी पूजा केली, लाडक्या लेकीचं औक्षण केलं आणि सोशल मीडियावर सर्वांना रुंजीची ओळख करून दिली.
शर्मिष्ठाने लेकीचं नाव रुंजी का ठेवलं?
शर्मिष्ठाने काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत तिने लेकीचं नाव रुंजी का ठेवलं? यामागचं कारणही सांगितलं होतं. अभिनेत्री म्हणते, “रुंजी म्हणजे अकस्मात सुंदर…मी आणि प्रतीक्षा ताई ( प्रतीक्षा लोणकर ) ‘अबोली’ नावाची मालिका करत होतो. मी तिला सहज विचारलं होतं की, तुझ्या मुलीचं नाव काय आहे? तर ती मला म्हणाली, ‘रुंजी.’ मला हे नाव फारच आवडलं होतं. त्यावेळी मी तिला म्हटलं होतं, मला जर मुलगी झाली तर हे नाव मी चोरणार आहे. मग ती म्हणाली, म्हणजे काय…तू नक्की ठेव.”

याशिवाय शर्मिष्ठाचा पती तेजसला सुद्धा हे नाव खूपच आवडलं होतं. म्हणूनच या दोघांनी लाडक्या लेकीचं नाव रुंजी असं ठेवलं आहे. दरम्यान, शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांचं लग्न लॉकडाऊनदम्यान ऑक्टोबर २०२० मध्ये झालं होतं. लग्नाच्या साडेचार वर्षांनंतर शर्मिष्ठा व तेजस आई-बाबा झाले आहेत.