Shashank Ketakar Shared A Video : अभिनेता शशांक केतकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. त्यामार्फत तो अनेकदा त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील, तसेच सामाजिक गोष्टींबाबतची त्याची मते व्यक्त करत असतो. अशातच त्याने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे.
शशांकने प्रवास करीत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरून पोस्ट केला आहे. यावेळी त्याने शहरातील रस्त्यांबद्दल त्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करीत भारतात नुकतीच लॉंच झालेल्या टेस्ला गाडीचा व्हिडीओ पोस्ट केलाय.
शशांकने यावेळी व्हिडीओला कॅप्शन देत म्हटले, “टेस्ला मोटर्स भारतात तुमचं स्वागत आहे आणि भारतात आहात, तर भारतीयांसारखंच करावं लागेल. गंमत याची वाटते की टेस्ला आणलीत! आता चांगले रस्ते? शिस्त? ती केव्हा आणाल?” अभिनेत्याने एका टेस्ला गाडीचा हा व्हिडीओ त्याच्या अकाउंटवरून शेअर केला असून, त्यामध्ये रस्त्यावरील खड्ड्यांवरून टेस्ला जात असल्याचं पाहायला मिळतं.
शशांक नेहमीच त्याच्या परिसरातील सेटवरील आजूबाजूच्या ठिकाणांचे व्हिडीओ व फोटो अनेकदा शेअर करत असतो. महत्त्वाची बाब म्हणजे अनेकदा त्याने शेअऱ केलेल्या व्हिडीओंना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे दिसते. त्यासह तो अनेकदा त्याच्या मुलाचे व्हिडीओ व फोटोही शेअर करीत असतो. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून शशांक नेहमीच प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत असतो.
नुकताच त्यानं स्वातंत्र्य दिनानिमित्त त्याच्या मुलाचा व्हिडीओ शेअर केला होता. यावेळी त्याच्या मुलानं स्वत: घरीच हातानं देशाचा झेंडा तिरंगा बनवल्याचं पाहायला मिळालं, ज्यामुळे अनेकांनी त्या व्हिडीओखाली कमेंट करीत त्याच्या मुलाचं कौतुक केलं होतं.
दरम्यान, शशांकबद्दल बोलायचं झालं, तर सध्या तो ‘स्टार प्रवाह’वरील ‘मुरांबा’ मालिकेत मुख्य भूमिका साकारत असून, त्याच्या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये क्रेझ आहे. नुकतेच मालिकेने सात वर्षांचं लिप घेतलं आहे. त्यामुळे मालिकेच्या कथानकात मोठं वळण आलं आहे. शशांक मालिकेसह वेब सीरिजमध्येही झळकला होता. अभिनेत्यानं आजवर नाटक, मालिका वेब सीरिज, तसेच चित्रपटांतही काम केलं आहे.