Shashank Ketkar on audiences comments: अभिनेता शशांक केतकर हा जितका त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो, तितकाच तो त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठीदेखील ओळखला जातो. सध्या अभिनेता मुरांबा या मालिकेत अक्षय ही भूमिका साकारताना दिसत आहे.

मुरांबा मालिकेत सात वर्षांचे लीप आले आहे, त्यामुळे मालिकेत अनेक बदल झाले आहे. या बदलानंतर शशांकने चाहत्यांशी संवाद साधला. हा व्हिडीओ स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये शशांकने काही प्रेक्षकांची मालिकेप्रति नाराजी असल्याच्या कमेंटवर वक्तव्य केले. अभिनेता नेमकं काय म्हणाला आहे हे जाणून घेऊ…

शशांक केतकर काय म्हणाला?

शशांक म्हणाला, “मुरांबा मालिकेवर तुम्ही खरंच प्रेम केलंत आणि ११०० भागांचा टप्पा मजेत, गमतीत आम्ही कधी पूर्ण केला हे आम्हाला कळलंच नाही. माझ्यासाठी प्रत्येक प्रोजेक्ट तितकंच महत्त्वाचं असतं. तर मुरांबा हे माझ्या करिअरमधील सर्वांत जास्त भाग असलेली मालिका आहे.”

मुरांबाचे नवीन पर्व सुरू झालं आहे. तुम्ही तो एपिसोड पाहिला असेल याची मला खात्री आहे. बऱ्याच तक्रारी असतात. अनेक तक्रारी आमच्याकडे येतात, नाराजी आमच्यापर्यंत पोहोचते. अरे अजून काय दाखवणार आहात?, मालिका अजून किती वाढवणार? अजून किती पाणी घालणार? अशा प्रकारची नाराजी, असा एक सूर असतो; तोदेखील आमच्यापर्यंत पोहोचत असतो.

पुढे शशांक म्हणाला की, प्रेक्षकांच्या या नाराजीकडे मी कसे बघतो हे तुम्हाला सांगतो. कुठल्याही एका सामान्य माणसाचा एक जॉब असतो. तर त्या जॉबचा कितीही कंटाळा आला तरी आपण आनंदाने करत असतो; तर हा आमच्यासाठी आनंदाने करण्याचा जॉब आहे. कृपया प्रेक्षकांनी त्याकडे कानाडोळा करू नका. आम्ही कलाकार या सगळ्यातील अत्यंत छोटा भाग आहोत. आमच्यावर निर्णय घेणारी मोठी जबाबदार मंडळी असतात. वाहिनी, लेखक-लेखिका, निर्माते, दिग्दर्शक, ब्रँण्ड्ज जे आम्हाला पाठिंबा देत असतात ते असतात, तर या सगळ्यांच्या होकारातून ही गोष्ट उभी राहते आणि आम्ही त्याचे प्रतिनिधित्व करत असतो. या नवीन गोष्टीचे आम्ही प्रतिनिधी आहोत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अशाही अनेक कमेंट येतात की तुमचं रमावर इतकं प्रेम आहे, तरी तुम्ही रमाला कसं ओळखू शकला नाही? पण, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात जसे टप्पे येतात. माणूस एका वेगळ्या विचारांमध्ये इतका अडकलेला असतो की खरं काय, खोटं काय हे अनेकदा कळत नाही. माणूस प्रेमात पडतो, जॉब करतो, लग्न करतो, भांडणं होतात, माणसं मोठी होत राहतात, भांडणं सोडवली जातात, नाती वाढत जात असतात; तर या सगळ्या टप्प्यांमधून, तुमच्या कथेतील पात्रंदेखील जात असतात. तसेच रमा-अक्षयदेखील त्या प्रोसेसमधून जात आहेत. गैरसमज झालेले आहेत, ते दूर होतील याची मला खात्री आहे”, असे म्हणत अभिनेत्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.