Shashank Ketkar on playing role of a father: अभिनेता शशांक केतकरने आतापर्यंत विविध मालिका, चित्रपट, वेब सीरिजमध्ये काम करत अनेक भूमिका साकारल्या आहेत. नेहमीपेक्षा वेगळ्या छटा असलेली पात्रे साकारत शशांकने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
शशांकच्या काही मालिकांना खूप लोकप्रियता मिळाली. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेने तो घराघरांत पोहोचला. या मालिकेतील श्री ही भूमिका मोठ्या प्रमाणात गाजली. याबरोबरच, मृणाल दुसानिसबरोबरची ‘सुखाच्या सरींनी मन हे बावरे’ या मालिकेलादेखील मोठी लोकप्रियता मिळाली. झी मराठी वाहिनीवरील ‘पाहिले ना मी तुला’ या मालिकेत त्याने खलनायकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
शशांक केतकर काय म्हणाला?
सध्या शशांक ‘मुरांबा‘ या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहे. अक्षय या भूमिकेतून तो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. सुरुवातीला रागीट असलेला पण तितकाच प्रेमळ आणि समजूतदार असा अक्षय प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे. मालिकेत शिवानी मुंढेकरने रमा ही भूमिका साकारली आहे. रमा-अक्षयची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत असल्याचे दिसते. आता मात्र, त्यांच्यात दुरावा आल्याचे मालिकेत पाहायला मिळत आहे.
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये ‘मुरांबा’ मालिकेत लीप येणार असल्याचे समोर आले आहे. रमा आणि अक्षय एकमेकांपासून दूर आहेत. रमा-अक्षयची मुलगी सात वर्षांची झाली आहे. प्रोमोमध्ये रमा आणि अक्षयचे लूक बदलल्याचे पाहायला मिळाले. तसेच त्यांच्या मुलीची पहिली झलकदेखील पाहायला मिळाली. त्यांच्या मुलीचे नाव आरोही असे आहे.
‘मुरांबा’ ही माझी सर्वांत जास्त भाग झालेली पहिलीच मालिका
मालिकेत सुरू होणाऱ्या नव्या अध्यायाविषयी शशांक केतकरने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मराठी सीरियल्स ऑफिशिअलशी अभिनेत्याने नुकताच संवाद साधला. शशांक म्हणाला, ‘मुरांबा’ ही माझी सर्वांत जास्त भाग झालेली पहिलीच मालिका आहे. या मालिकेमुळे मला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले.
आता मालिकेत नवीन वळण येणार आहे. यामध्ये मी एका मुलीच्या वडिलांची भूमिका साकारणार आहे. सात वर्षांच्या मुलीच्या वडिलांची अशी भूमिका मी यापूर्वी कधीही साकारलेली नाही, त्यामुळे ही भूमिका माझ्यासाठी खास असणार आहे. खऱ्या आयुष्यातसुद्धा मी वडील असल्याने शूटिंगवेळी माझ्यातला बाप डोकावत असतो. प्रेक्षकांना मालिकेतलं नवं वळण आवडेल, याची खात्री आहे”, असे म्हणत शशांकने त्याच्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, बालकलाकार आरंभी उबाळे आरोहीची भूमिका साकारत आहे.