Shashank Ketkar Angry Video : अनेक मराठी कलाकार हे सोशल मीडियावर राजकीय तसंच सामाजिक प्रश्नांबद्दल आवाज उठवताना दिसतात. यापैकीच एक अभिनेता म्हणजे शशांक केतकर. शशांक सोशल मीडियाद्वारे अनेक सामाजिक प्रश्नांबद्दल व्यक्त होत असतो. रस्ता, त्यावरील खड्डे, कचरा, ट्रॅफिक, नागरिकांकडून मोडले जाणारे वाहतुकीचे नियम याबद्दल शशांक त्याची परखड मते व्यक्त करत असतो.
अशातच शशांकने नुकताच नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. मालाडमधील मढ आयलंडच्या दिशेने जाणारा नवीन रस्ता बांधण्यात आला आहे, मात्र या रस्त्याच्या मध्यभागी दोन झाडे आहेत. या झाडांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. याचबद्दल शशांकने व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे. या व्हिडीओमधून त्याने हा भ्रष्टाचार नाही तर कंटाळा आणि दुर्लक्ष केलं असल्याचंही मत व्यक्त केलं आहे.
मढ आयलंडमधील रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या झाडांचा व्हिडीओ शेअर करत शशांक असं म्हणतो, “पावसाळ्याचे दिवस आहेत. रस्त्यावरील लाईट्स बंद असतील, धो धो पाऊस पडत असेल आणि आम्हाला रस्त्याच्या मध्यभागी असलेली झाडे दिसलीच नाहीत तर… मला माहित आहे की, मी हा असा आवाज उठवतो, तो अनेकांसाठी हास्यास्पद असेल; पण प्रत्येकाच्या मनाला ते कुठेतरी पटत असतं.”
यानंतर तो म्हणतो, “ही अशी परिस्थिती आपल्याला मुंबईत, महाराष्ट्रात, भारतात अगदी प्रत्येक रस्त्यावर दिसते. विकास खूप होत आहे, हे मान्य. पण हा काय भ्रष्टाचार नाही. हा निष्काळजीपणा आहे. मढ आयलंडचा हा रस्ता अनेक वर्षांनी करण्यात आला आहे. हा रस्ता करताना काही झाडे तोडली, पण ही दोन झाडे का ठेवण्यात आली आहेत हे कोडं मला सुटलेलं नाही.”
यापुढे शशांक म्हणतो, “जपानी पद्धतीने झाडे मुळापासून तोडून ती पुन्हा नवीन ठिकाणी लावणं ही अपेक्षाच नाही आणि झाडे तोडून तुम्ही रस्ता करा किंवा विकास करा या मताचाही मी नाही. पण आता तुम्ही हा रस्ता केलाच आहात; मग ही दोन झाडे का ठेवली आहेत? म्हणजे ही झाडे रस्त्याची शोभा वाढवत आहेत की, दुभाजकाचं काम करत आहेत हेच मला कळत नाही.”
यापुढे त्याने म्हटलं, “जमलं तर झाडाच्या दोन्ही बाजूंना दोन रिफ्लेक्टर लावा आणि ते ऑनलाईन मिळतात. त्यांची लिंक हवं तर मी देतो. त्यांचं बजेट अजून निघालं नसेल किंवा त्याचं कंत्राट अजून कोणाला दिलेलं नसेल, तर ते कंत्राट मला द्या. शशांक केतकर यांच्याकडून असं लिहिलेलं दोन रिफ्लेक्टर तरी त्या झाडाला लावा. म्हणजे आमच्या गाड्यांचे लाईट्स त्यावर पडतील आणि त्या रिफ्लेक्टरमुळे आम्हाला झाडे दिसतील.”
यानंतर शशांकने असं म्हटलं, “आम्हाला मरायची इच्छा नाही. तुम्हाला आमची काळजी नसली तरी आम्हाला आमची काळजी आहे. त्यामुळे दोन रिफ्लेक्टर मागवा आणि ते या झाडांना लावा किंवा या झाडांचं काहीतरी करा. कारण ही झाडे रस्त्याच्या मध्येही नाहीत किंवा बाजूलाही नाहीत. त्यात या झाडांना रिफ्लेक्टरसुद्धा नाहीत.”
या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये शशांकने असं म्हटलं आहे, “देशात विकास होत आहे, याचा खरचं आनंद आणि अभिमान आहे. पण या आणि अशा दुर्लक्षित छोट्या छोट्या लाखों गोष्टी आहेत. हे फक्त एक उदाहरण. पाऊस खूप असेल वा नसेल, समोरचं नीट दिसेल वा नसेल… आम्ही सामान्य माणसांनी स्वतः चा जीव कसा वाचवायचा? हा भ्रष्टाचारसुद्धा नाही… हा फक्त कंटाळा, निष्काळजीपणा आणि ‘चलता है’ ही वृत्ती आहे.”
यानंतर त्याने म्हटलं, “व्हिडीओमध्ये म्हटल्याप्रमाणे मी रिफ्लेक्टर द्यायला तयार आहे. हेच रिफ्लेक्टर घ्या, असा माझा हट्ट नाही. तुम्ही सांगा ते मी देईन. पण काहीतरी करा.” यापुढे शशांकने आणि बीएमसी स्थानिक आमदाराचा उल्लेख करत, ज्यांची जबाबदारी आहे त्यांच्यापर्यंत निरोप तुम्ही पोहोचवाल आणि काम होईल याची खात्री आहे, कारण या शहरातल्या प्रत्येकाची तुम्हाला काळजी आहे याचीही मला खात्री आहे.” असं म्हटलं आहे