Shilpa Shirodkar Talks About Namrata Shirodkar & Mahesh babu : शिल्पा शिरोडकर बॉलीवूडमधील ९०च्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर तिने अनेक चित्रपटांत काम केलं आहे. पण, मधल्या काळात ती अभिनय क्षेत्रात सक्रिय नव्हती. लग्नानंतर अभिनेत्रीने ब्रेक घेतला होता आणि ती परदेशात स्थायिक झालेली. परंतु, तिने पुन्हा इंडस्ट्रीत पुनरागमन केलं.

मोठ्या ब्रेकनंतर जेव्हा शिल्पाला पुन्हा काम करायचं होतं तेव्हा तिला इतक्या सहजासहजी काम मिळालं नाही, त्यामुळेच तिने ‘बिग बॉस’मध्येही जाण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. मात्र, त्यावेळी ‘बिग बॉस’साठी तिची धाकटी बहीण अभिनेत्री नम्रता शिरोडकर व तिचा नवरा दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू यांनी विरोध केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

‘बिग बॉस’बद्दल शिल्पा शिरोडकरची प्रतिक्रिया

शिल्पाने आता ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितलं आहे. तिला याबद्दल विचारण्यात आल्यानंतर ती म्हणाली, “हे सगळं खोटं आहे. लोकांना अशा गोष्टींबद्दल बोलायला आवडतं. हल्ली लोक सोशल मीडियावर त्यांच्या प्रतिक्रिया, मतं व्यक्त करत असतात, पण माझं कुटुंब तसं नाहीये. आमचं आयुष्य सोशल मीडियाच्या भोवती फिरत नाही. मला याबद्दल कोणालाही स्पष्टीकरण देणं गरजेचं वाटत नाही.”

शिल्पा शिरोडकर पुढे म्हणाली, “माझा नवरा, माझी मुलगी, बहीण, माझे भावोजी, माझा भाचा-भाची खूप चांगले आहेत. त्या सगळ्यांना माझा अभिमान आहे.” शिल्पाने पुढे ते दोन वर्षं कामाच्या शोधात होती याबद्दल सांगितलं आहे.

शिल्पाला मुलाखतीत जेव्हा तिने पैशांसाठी ‘बिग बॉस’मध्ये सहभाग घेतलेला का असं विचारण्यात आलेलं, तेव्हा ती म्हणाली, “पैसे की काम? लोक म्हणतात ज्यांच्याकडे काम नसतं ते ‘बिग बॉस’मध्ये जातात. मी ‘बिग बॉस’मध्ये गेले होते, कारण मला काम हवं होतं. या व्यतिरिक्त ‘बिग बॉस’मधून मला काय मिळणार आहे याबद्दल मला माहिती नव्हती.”

शिल्पा शिरोडकर पुढे ‘बिग बॉस’बद्दल म्हणाली, “मला माझे कुटुंबीय म्हणायचे की, तू ‘बिग बॉस’मध्ये जायला हवं. त्यामुळे जेव्हा त्यांनी मला विचारलं तेव्हा मला ती संधी गमवावीशी नाही वाटली. हो, पैसे त्याबरोबर येतातच. लोकप्रियताही मिळते. हे मला त्यामधून बाहेर आल्यानतंर समजलं.’

अभिनेत्री पुढे म्हणाली, “मी दोन वर्ष कामाच्या शोधात होते. कोणाचेही मला फोन यायचे नाही. कोणीही मुलाखती घेतल्या नाही. पण, लोकांना आता मी जशी आहे तशी आवडते. मला अजूनही त्यांच्याकडून खूप प्रेम आणि आदर मिळतो, कारण त्यांनी मी खरी कशी आहे हे ‘बिग बॉस’मध्ये पाहिलंय; त्यामुळे ‘बिग बॉस’मध्ये जाऊन मी चांगलं काम केलं.”