Gaurav Kalushte on Chala Hawa Yeu Dya: ‘चला हवा येऊ द्या- कॉमेडीचं गँगवॉर’ हा विनोदी कार्यक्रम सध्या चर्चेत आहे. कार्यक्रमाच्या या नवीन पर्वात प्रियदर्शन जाधव, गौरव मोरे, कुशल बद्रिके, भरत गणेशपुरे आणि श्रेया बुगडे यांच्यासह अनेक कलाकार सहभागी झाले आहेत.
शिवा मालिकेत पाना गँगमधील महत्त्वाचा सदस्य डिप्पर ही भूमिका अभिनेता गौरव काळुष्ठेने साकारली आहे. शिवाचा खास आणि जवळचा मित्र म्हणून डिप्परची ओळख निर्माण झाली होती. अभिनेता या मालिकेतून घराघरांत पोहोचला. आता शिवा ही मालिका निरोप घेत आहे. यादरम्यानच अभिनेता चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
अभिनेता काय म्हणाला?
आता गौरवने नुकतीच अल्ट्रा मराठी बझला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाबाबत वक्तव्य केले. तो म्हणाला, “चला हवा येऊ द्यामध्ये मी काम करणार आहे, हे समजल्यावर माझे आई-बाबा खूश आहेत. मी मध्यंतरी महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात एका एपिसोडमध्ये काम केलं होतं. मी आई-बाबांना सांगितलं की मी ऑडिशन देऊन आलो आहे. मग मी त्यांना सांगितलं की मी जेव्हा परफॉर्म केलं तेव्हा सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी दोघेही होते.
“सचिन गोस्वामींनी त्यामध्ये परफॉर्म केलं होतं आणि शेवटी जेव्हा सगळ्यांना स्टेजवर बोलावलं तेव्हा सचिन मोटेदेखील आले होते. ते दोघेही तिथे असल्याने मला नम्रता संभेराव म्हणालेली की, तू नशीब घेऊन आला आहेस.”
“आता जेव्हा मी चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात काम करणार असं घरी सांगितलं, तेव्हा आई-बाबा खूप खूश होते, कारण चला हवा येऊ द्या हा ब्रँड आहे. मी माझ्या कॉलेजच्या काळात फक्त तेच बघितलं आहे. आमच्या घरी चला हवा येऊ द्या इतकं बघितलं जायचं की जवळजवळ सगळे एपिसोड आम्ही चाळून काढले आहेत. निलेश साबळे सरांपासून जी त्यामधील सगळी मोठी मंडळी आहेत, त्यांना बघून जी प्रेरणा मिळाली, त्यातून आता त्यांच्यासोबत थोडं थोडं काम करतोय.”
पुढे अभिनेता म्हणाला, “श्रेया ताई, गौरव मोरे, भरत सर, कुशल दादा आणि प्रियदर्शन सर ही मंडळी मेन्टॉर म्हणून आहेत. पहिल्या दिवशी ही सगळी मंडळी आमच्याबरोबर बसली होती. खूप वर्षांपासूनचे मित्र असतो, तसे ते आमच्याशी गप्पा मारत होते. त्यांनी कुठल्याच नटाला असं दाखवलं नाही की आम्ही किती वर्षे काम करतोय आणि तुम्ही आता आला आहात. ते आमच्याशी खूप चांगले वागले. आमच्यावर दडपण होतं की इतक्या मोठ्या लोकांसमोर कसं काम करणार वगैरे; पण त्यांनी पहिल्याच दिवशी दडपण काढून टाकलं. सेटवर मजा असते. तर हे काही घडतं ते मी माझ्या पालकांना व्हिडीओ कॉल करून पटकन सांगून टाकतो.”
दरम्यान, गौरव काळुष्ठे हा कुशल बद्रिकेच्या टीममध्ये असल्याचे पाहायला मिळते. आता शिवानंतर ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून गौरव प्रेक्षकांचे मन जिंकणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.