‘गुलाबी साडी’ या गाण्यामुळे संजू राठोड जगभरात लोकप्रिय झाला आहे. त्याच्या या गाण्याचं सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात आलं होतं. ‘गुलाबी साडी’, ‘काली बिंदी’ या गाण्यांनंतर आता नुकतंच त्याचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात संजूच्या सोबतीला ‘बिग बॉस’ ( हिंदी ) फेम अभिनेत्री ईशा मालवीय झळकली आहे. या गाण्याचं नाव आहे ‘शेकी’.
सध्या संजूच्या ‘शेकी’ गाण्याची सर्वत्र तुफान चर्चा होत आहे. सोशल मीडियावर देखील हे गाणं ट्रेंडिंग आहे त्यामुळेच सामान्य लोकांपासून, अनेक इन्फ्लुएन्सर्स, मराठीसह बॉलीवूड सेलिब्रिटी सगळेच या गाण्यावर थिरकत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून संजू राठोडच्या ‘शेकी’ गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी या गाण्यावर “एक नंबर, तुझी कंबर…”, म्हणत ठेका धरल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच बालकलाकार साईराज केंद्रे आणि वेदांती भोसले या दोघांनी संजूच्या ‘शेकी’ गाण्यावर जबरदस्त एक्स्प्रेशन्स देत डान्स केला होता.
आता ‘झी मराठी’वरील ‘शिवा’ मालिकेच्या टीमला सुद्धा या गाण्याची भुरळ पडली आहे. पूर्वा कौशिक ( शिवा ), गौरव कालुष्टे ( डिप्पर ), सृष्टी बाहेकर ( दिव्या ), विठ्ठल तळवलकर ( अप्पर ), हसन शेख ( स्टेपनी ) या सगळ्या कलाकारांनी एकत्र मिळून ‘शेकी’ गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे.
‘शिवा’ मालिकेतील हे पाचही कलाकार जबरदस्त एनर्जीसह ‘शेकी’ गाण्यावर थिरकले आहेत. नेटकऱ्यांनी यांच्या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडत या कलाकारांचं कौतुक केलं आहे. “अरे वाह…”, “वाह खरंच सुंदर डान्स केलाय…सगळे भारी दिसत आहेत”, “लय भारी डान्स झालाय”, “पूर्वा यु आर टू गूड” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या डान्स व्हिडीओवर दिल्या आहेत.
दरम्यान, ‘शिवा’ मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर ही मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर रात्री ९ वाजता प्रसारित केली जाते. यामध्ये अभिनेत्री पूर्वा कौशिक आणि अभिनेता शाल्व किंजवडेकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.