‘लाखात एक आमचा दादा'(Lakhat Ek Aamcha Dada) आणि ‘शिवा'(Shiva) या दोन्ही प्रेक्षकांच्या लाडक्या मालिका आहेत. प्रेमळ स्वभावामुळे, साध्या राहणीमानामुळे व सर्वांच्या मदतीला धावून जाण्याच्या सवयीमुळे सूर्या दादा प्रेक्षकांना त्यांच्यातीलच एक वाटतो, तर कुटुंबासाठी काहीही करण्यास तयार असणारी, धाडसी शिवा प्रेक्षकांचे मन जिंकून घेते. आता शिवा व सूर्या दादा प्रेक्षकांना एकत्र भेटण्यासाठी येणार आहेत. याचा एक प्रोमो झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
शिवा आणि सूर्या बालपणीचे मित्र
झी मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, सूर्या रस्त्यावर गुंडांच्या मध्ये उभा आहे, तो त्यांच्याबरोबर मारामारी करत आहे. तुळजा त्याच्याकडे पळत येताना दिसते. तोपर्यंत एक गुंड तिला धरतो. तुळजा मोठ्याने सूर्या असे ओरडते. तो गुंड तिला ब्रीजवरून खाली फेकतो. सूर्या तिला वाचवण्यासाठी पळत जातो. तुळजाने कशालातरी पकडले असल्याने ती खाली नदीत पडली नाही. सूर्या तिला हात द्यायला जातो, मात्र गुंड त्याला मारण्यासाठी येतात. तितक्यात त्या गुंडांना कोणीतरी मारताना दिसते आणि सूर्याकडे मदतीचा हात पुढे केला जातो. तो शिवाचा हात असतो. शिवा सूर्याला वाचवते. सूर्या वरती येतो आणि दोघे मिळून गुंडांना मारतात. यावेळी त्यांच्या लहानपणी ते एकमेकांना हात देत असल्याचा सीन पाहायला मिळतो.
हा व्हिडीओ सुरू असताना ऐकायला मिळते, “नजर त्याची पॉवरफुल, दुश्मनांची होते हवा गुल, आला कोणी आडवा तर हिशोब एकच, मरेपर्यंत तुडवा. पण, जेव्हा काळजावर होतो त्याच्या वार, नशिबासमोर होते हार; तेव्हा मदतीला येतो एकच हात आणि संकटावर तो करतो मात, धमाल मनोरंजनाचा आहे वादा, एकत्र भेटायला येताहेत शिवा-दादा”
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने म्हटले, “सूर्या आणि शिवाची भेट होणार, बालपणीचे मित्र एकत्र येणार..!”
प्रोमोमध्ये दाखविल्याप्रमाणे शिवा आणि सूर्या लहानपणीचे मित्र आहेत, त्यामुळे आता शिवा आणि सूर्या दादा एकत्र दिसणार असल्याने कोणती गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे दिसत आहे. ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत सध्या तेजूच्या लग्नाची तयारी सुरू आहे, तर ‘शिवा’ मालिकेत आशू आणि शिवामध्ये पुन्हा एकदा दुरावा आल्याचे पाहायला मिळत आहे, त्यामुळे मालिकेत पुढे काय होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.