Shivali Parab Dance Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अभिनेत्री शिवाली परब घराघरांत लोकप्रिय झाली आहे. तिचं सुंदर हसणं आणि दमदार अभिनयाचे लाखो चाहते आहेत. विनोदाचं अचूक टायमिंग साधत शिवालीने प्रत्येकाचं मन जिंकून घेतलं आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवाली सोशल मीडियावर तिचे डान्स व्हिडीओ शेअर करतेय. अभिनेत्रीची नृत्यशैली पाहून तिचे सगळे चाहते थक्क झाले आहेत.

शिवालीने काही दिवसांपूर्वीच ‘गोविंदा’च्या गाण्यावर जबरदस्त डान्स केला होता. आता अभिनेत्री नुकतीच आशा भोसलेंच्या जुन्या गाण्यावर थिरकली आहे. या डान्स व्हिडीओमध्ये शिवालीला प्रसिद्ध कोरिओग्राफर रुपेश बने याने साथ दिली आहे.

१९७१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कारवां’ सिनेमातील “पिया तू अब आजा…मोनिका ओ माय डार्लिंग” या गाण्यावर शिवाली व रुपेशने भन्नाट डान्स केला आहे. हे मूळ गाणं आशा भोसले यांनी गायलं असून, या गाण्याला ५४ वर्षे झाली असली, तरी घराघरांत या गाण्याची लोकप्रियता आजही कायम आहे.

शिवाली परबने, “वेलकम टू बॉलीवूड हाऊस” असं कॅप्शन देत हा खास व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ राहत्या घरी शूट करण्यात आला आहे. व्हिडीओग्राफी आणि रुपेश बनेच्या कोरिओग्राफीचं चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं आहे. पृथ्वीक प्रतापने या व्हिडीओवर “Woaaahhh” अशी कमेंट केली आहे. तर, चेतनाने या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत “कमाल” म्हटलं आहे.

शिवालीचं नृत्यकौशल्य पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. “सुपर जस्ट लव्ह इट”, “कॅमेरामनचं विशेष क्रेडिट आहे काय सुंदर शूट केलंय”, “बेस्ट कोरिओग्राफी”, “मस्तच फुल मार्क्स”, “शिवाली जबरदस्त” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.

दरम्यान, शिवालीने नुकतीच ‘लोकसत्ता श्रावणरंग’ला उपस्थिती लावली होती. यावेळी अभिनेत्रीला तिच्या छुप्या टॅलेंटबद्दल विचारण्यात आलं होतं. यावर अभिनेत्री म्हणाली, “लोकांना माझ्यातील सगळे कलागुण माहिती आहेत. हास्यजत्रेत त्यांनी सगळं पाहिलंय. पण, मला स्वत:ला माझ्यातील डान्स हे टॅलेंट खूप आवडतं. जे मी अजून म्हणावं तसं एक्सप्लोर केलेलं नाहीये.”