Shivani Naik & Amit Rekhi Lovestory : अभिनेत्री शिवानी नाईक व अमित रेखी यांनी अलीकडेच साखरपुड्याचे फोटो पोस्ट करीत त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. या दोघांची प्रेमकहाणी खूप खास असून, गेली आठ वर्षं ते रिलेशनशिपमध्ये होते. अशातच आता त्यांनी त्यांच्या या हटके प्रेमकहाणीबद्दल सांगितलं आहे.

शिवानी व अमित यांनी ‘मराठी मनोरंजन विश्व’ला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी त्यांची प्रेमकहाणी कशी सुरू झाली, कोणी आधी पुढाकार घेतला होता याबद्दल सांगितलं आहे. त्यामध्ये शिवानी म्हणाली, “मी माझं काम आणि माझी एकांकिका करत होते. मला फक्त मेसेज आलेला की, तू मला आवडतेस वगैरे.”

अमित याबद्दल पुढे म्हणाला, “मला आधी ती अभिनेत्री म्हणून खूप आवडली. स्टेजवर काम करताना जेव्हा तिला पाहिलं. कमाल अभिनय आणि ती एकांकिकाही खूप कमाल होती. नंतर मी माणूस म्हणूनही तिच्या प्रेमात पडलो. मी चार-पाच महिने फक्त तिला बघत होतो. प्रत्येक थिएटरमध्ये. तिची सगळी टीम मला ओळखायची; पण हिच्याशी मी कधी बोललोच नाही.”

सहा मिहन्यांनी दिला होकार

अमित पुढे म्हणाला, “मी तिला सोशल मीडियावर खूप शोधलं फेसबुक, इन्स्टाग्रामवर. शेवटी ती मला दिसली आणि मग मी तिला मेसेज केला. तिला सगळं मनातलं सागितलं. त्यानंतर सहा महिन्यांनी तिनं वेळ घेऊन हा मुलगा कोण आहे, कसा आहे काय त्याची पार्श्वभूमी आहे हा सगळा विचार करून मला होकार दिला.”

शिवानी पुढे म्हणाली, “आम्ही दोघेही एकमेकांचे घट्ट मित्र-मैत्रीण आहोत आणि प्रेम आहेच; पण आता खूप मोठी जबाबदारी आणि आवाहनही आहे.” अमितनं पुढे त्यानं शिवानीला कसं प्रपोज केलं याबद्दल सांगितलं आहे. अमित म्हणाला, “मी इन्स्टाग्रामवर मेसेज करून तिला सांगितलं होतं की, मला तू आवडतेस वगैरे. फार साधं होतं सगळं. एकतर्फी प्रेम होतं माझं. मग मी व्यक्त झालो तिच्याकडे. त्यानंतर तिनं वेळ घेऊन उत्तर दिलं एवढंच.”

शिवानीनं पुढे घरच्यांची काय प्रतिक्रिया होती याबद्दल सांगितलं आहे. ती म्हणाली, “घरच्यांची प्रतिक्रिया चांगली होती. कारण- ते अमितला जवळपास पाच-सहा वर्षं बघत होते. कारण- आम्हाला जेव्हाही भेटायचं असायचं तेव्हा आम्ही घरीच भेटायचो.” अमित याबद्दल पुढे म्हणाला, “आजही मला ते जावई मानत नाहीत; त्यांचा मुलगाच मानतात”. शिवानी पुढे म्हणाली, “त्यांना हा खूप आवडलेला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्यापेक्षा माझ्या घरच्यांना भेटायला जास्त आवडायचं. आम्ही कायम एकमेकांच्या घरीच भेटायचो.”