Happy Birthday Shivani Sonar : ‘राजा रानीची गं जोडी’ या मालिकेमुळे अभिनेत्री शिवानी सोनार घराघरांत लोकप्रिय झाली. ही मालिका आणि यामध्ये शिवानीने साकारलेली संजू ही भूमिका सर्वत्र प्रचंड गाजली होती. यानंतर तिने लोकप्रिय अभिनेता सुबोध भावेसह ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत काम केलं. आता शिवानी ‘तारिणी’च्या रुपात पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाली आहे. आज प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्रीचा वाढदिवस आहे.
शिवानी सोनार वैयक्तिक आयुष्यात ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेता अंबर गणपुळेसह लग्नबंधनात अडकली आहे. या दोघांचा विवाहसोहळा यावर्षी २१ जानेवारीला थाटामाटात पार पडला होता. आज अंबरने पत्नीच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
अंबर लिहितो, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माय लव्ह. तुला आयुष्यात भरभरून यश मिळो…तू खरंच ते डिझर्व्ह करतेस. देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो… बाकी पागलपंती रुकनी नही चाहिए. लव्ह यू शिवानी.” अंबरच्या पोस्टवर नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी कमेंट्सचा वर्षाव करत शिवानीला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
शिवानी आणि अंबरची फिल्मी लव्हस्टोरी
शिवानीने तिची लव्हस्टोरी ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितली होती. “आम्ही दोघं एकमेकांना भेटणं हे अनपेक्षित होतं. कारण आम्ही दोघेही वेगळे आणि दोन टोकाची माणसं आहोत. मी खूप वेगळी आहे आणि तो खूप वेगळा आहे. थोडक्यात लव्हस्टोरी सांगते. अंबर पुण्याचा आहे आणि मी माझा एक शो संपवून पुण्यात आले होते, आम्ही दोघं एकमेकांना ओळखतही नव्हतो. फारतर नाटकाच्या प्रयोगाला किंवा कोणाच्या तरी लग्नाला भेटलो असू तेवढीच ओळख होती. मैत्री वगैरे काहीच नव्हती.”
“मी पुण्याला गेल्यावर पुढच्या १५ दिवसांत आमचा एक कॉमन मित्र आहे त्याला आमच्याबरोबर शॉर्ट फिल्म करायची होती. त्याच्या डोक्यात खूप दिवसांपासून होतं की, आम्हाला कपल म्हणून कास्ट करायचं आणि त्यानंतर आम्ही भेटलो…वाचन, रिहर्सल झाली. पण काही कारणास्तव ती शॉर्ट फिल्म पूर्ण झाली नाही. पण आमची फिल्म वर्क ( लव्हस्टोरी ) झाली. नंतर मग आम्ही एकमेकांशी बोललो, विचार जाणून घेतले. आमच्या जवळच्या सगळ्यांनाच याबद्दल माहिती होतं. आम्ही एकमेकांच्या घरी सांगितल्यावरही काहीच प्रॉब्लेम झाला नाही.” असं शिवानीने सांगितलं.
दरम्यान, अभिनेत्री शिवानी सोनार आता लवकरच ‘तारिणी’ मालिकेत झळकणार आहे. ही मालिका ११ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तिच्यासह अभिनेता स्वराज नागरगोजे आणि अभिनेेत्री अभिज्ञा भावे हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत.