Shivani Sonar New Car Photo : शिवानी सोनार गेल्या काही दिवसांपासून तिच्या ‘तारिणी’ या नव्या मालिकेमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री ‘झी मराठी’च्या ‘तारिणी’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहे. येत्या ११ ऑगस्टपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण, त्याआधीच अभिनेत्रीने सर्वांना एक आनंदाची बातमी दिली आहे.
आपलं हक्काचं घर आणि गाडी असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी गेल्या काही दिवसांत नवीन गाड्या खरेदी केल्याचं पाहायला मिळालं होतं. या यादीत आता शिवानी सोनारचं नाव जोडलं गेलं आहे. अभिनेत्रीने नुकतीच नवीन गाडी घेतली आहे.
शिवानी सोनारने तिची ‘तारिणी’ ही मालिका सुरू होण्याआधी नवीन गाडी खरेदी केली आहे. नव्या गाडीचे फोटो अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. शिवानीने या फोटोला, “अखेर माझ्या तारिणीचं आगमन झालेलं आहे” असं कॅप्शन दिलं आहे. यापुढे अभिनेत्रीने “नवीन गाडी, टाटा फॅमिली, तारिणी” असे हॅशटॅग दिले आहेत.
शिवानी सोनारने घेतली नवीन गाडी
शिवानी गाडी खरेदी करण्यासाठी ऑफ व्हाइट रंगाची सुंदर साडी नेसून गेली होती. यावेळी तिचा पती अंबर गणपुळे व कुटुंबीय देखील उपस्थित होते. अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी नव्या गाडीची पूजा करून त्यांच्या घरच्या तारिणीचं आनंदाने स्वागत केलं.
सुमीत पुसावळे, सायली संजीव, ऋतुजा बागवे, हर्षदा खानविलकर, प्रियदर्शिनी इंदलकर, दिव्या पुगावकर, क्षितीश दाते, मणिराज पवार या कलाकारांनी कमेंट्स करत शिवानीला या नव्या गाडीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, शिवानी सोनारच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेत्रीने २१ जानेवारी २०२५ रोजी अभिनेता अंबर गणपुळेशी लग्न केलं. शिवानी आणि अंबरच्या लग्नाला मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकार मंडळी उपस्थित होती. आता शिवानी लवकरच ‘तारिणी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तिच्यासह स्वराज नागरगोजे, अभिज्ञा भावे, सुवेधा देसाई, आरती वडगबाळकर, नियती राजवाडे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.