Shivani Sonar New Serial Muhurta : छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नवीन विषय असलेल्या मालिका येत आहेत. स्टार प्रवाहने नुकतीच ‘लपंडाव’ या मालिकेची घोषणा केली. त्याचपाठोपाठ झी मराठीनेही नव्या मालिकेची घोषणा केली, ही मालिका म्हणजे ‘तारिणी’. या नव्या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सोनार मुख्य भूमिका साकारत आहे.
शिवानीने यापूर्वी कलर्स मराठीच्या ‘राजा रानीची गं जोडी’ आणि सोनी मराठीवरील ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत काम केलं आहे. त्यानंतर आता ती ‘तारिणी’मधून नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘तारिणी’च्या प्रोमोमधून शिवानीचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळत आहे. त्यामुळे या मालिकेद्वारे प्रेक्षकांना नवी कथा पाहायला मिळणार आहे.
‘तारिणी’ या मालिकेत शिवानी सोनारसह झी मराठीवरीलच अभिनेत्री अभिज्ञा भावे ही सुद्धा झळकणार आहेत. हिंदी मालिका आणि ओटीटीनंतर अभिज्ञा या मालिकेनिमित्ताने पुन्हा एकदा छोट्या पडद्याद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.
‘तारिणी’ ही नवीन मालिका कधी आणि केव्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण नुकताच या मालिकेचा मुहूर्त पार पडला असून याबद्दल अभिज्ञाने सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. अभिज्ञाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मालिकेचा मुहूर्त पार पडल्याचा फोटो शेअर केला आहे.

अभिज्ञाने या फोटोसह ‘बाप्पा मोरया’ असं लिहिलं आहे. तर तिने शेअर केलेल्या या फोटोमध्ये आजूबाजूला पूजेचं साहित्य असलेलं पाहायला मिळत आहे. तसंच एक क्लॅपही आहे, ज्यावर ‘झी मराठी’, ‘तारिणी’ यासह मालिकेची निर्माती शर्मिष्ठा राऊत आणि दिग्दर्शकाचं नाव लिहिलेलं पाहायला मिळत आहे.
‘तारिणी’ या मालिकेत शिवानी आणि अभिज्ञा यांच्यासह अभिनेता स्वराज नागरगोजे हा मुख्य नायकाची भूमिका साकारणार आहे. तर अभिननेत्री आरती वडगबाळकरही बऱ्याच कालावधीनंतर ‘तारिणी’च्या माध्यमातून छोट्या पडद्यावर दिसणार आहे. त्यामुळे या नव्या मालिकेची अनेक प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
तारिणी मालिका प्रोमो
दरम्यान, शिवानी सोनार, अभिज्ञा भावे आणि स्वराज नागरगोजे यांच्या ‘तारिणी’ मालिकेच्या नुकत्याच आलेल्या प्रोमोला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसंच इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनीसुद्धा शिवानी सोनार, अभिज्ञा भावे यांसह मालिकेतील इतर कलाकारांचं कौतुक केलं आहे.