Happy Birthday Ambar Ganpule : ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजेच अंबर गणपुळे. याशिवाय त्याने ‘दुर्गा’, ‘लोकमान्य’ अशा बऱ्याच मालिकांमध्ये काम केलेलं आहे. आज प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्याचा वाढदिवस आहे. संपूर्ण मराठी कलाविश्वातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
अंबरचे विविध मालिकांमधील सहकलाकार रेश्मा शिंदे, हर्षदा खानविलकर, आशुतोष गोखले यांनी देखील खास पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहे. याशिवाय त्याची पत्नी शिवानी सोनारने देखील त्याच्या वाढदिवसानिमित्त खास रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे.
शिवानी लिहिते, “एके दिवशी अचानक एका मुलाची माझ्या आयुष्यात एन्ट्री झाली. त्याचं येणं अनपेक्षित होतं…काहीच पूर्वनियोजित नव्हतं. पण, त्याच्यात काहीतरी खास होतं. त्याने मला स्वत:कडे नव्याने पाहायला शिकवलं. एखाद्यावर आपण भावनिकदृष्ट्या अवलंबून राहतोय हे फिलिंग किती सुंदर असू शकतं याची जाणीव मला त्याच्यामुळे झाली. तो मुलगा इतक्या अनपेक्षितपणे आला आणि माझा जीवनसाथी झाला. वाढदिवसाच्या शुभेच्छा…You Are My Home. ‘के जब तू सजन मेरे पास है कुछ और ना चाहे अंखियां”
शिवानीच्या या पोस्टवर अंबरने “आय लव्ह यू” अशी कमेंट करत रिप्लाय दिला आहे. याशिवाय चाहत्यांनी सुद्धा शिवानीच्या पोस्टवर अंबरसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. वैयक्तिक आयुष्यात शिवानी-अंबरने यावर्षी २१ जानेवारीला लग्नगाठ बांधली. या दोघांच्या विवाहसोहळ्याला मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकार उपस्थित होते.
दरम्यान, अभिनेत्री शिवानी सोनारच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर ‘राजा रानीची गं जोडी’ या मालिकेमुळे अभिनेत्री घराघरांत लोकप्रिय झाली. यामध्ये शिवानीने साकारलेली संजू ही भूमिका सर्वत्र प्रचंड गाजली होती. यानंतर तिने लोकप्रिय अभिनेता सुबोध भावेसह ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत काम केलं. सध्या ती ‘झी मराठी’च्या ‘तारिणी’ मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. ही मालिका ११ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यामध्ये तिच्यासह अभिनेता स्वराज नागरगोजे आणि अभिनेत्री अभिज्ञा भावे हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये झळकत आहेत.