Shivani Surve Thoda Tuza Ani Thoda Maza Serial Off Air : शिवानी सुर्वेने तब्बल ९ वर्षांनी टेलिव्हिजनवर कमबॅक करत ‘स्टार प्रवाह’च्या ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. ही मालिका १७ जून २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली. यामध्ये शिवानीने साकारलेली मानसीची भूमिका प्रत्येकाच्या पसंतीस उतरली. ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच प्रेक्षकांना शिवानी सुर्वे आणि समीर परांजपे यांची ऑनस्क्रीन जोडी पाहायला मिळाली. आता लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
या मालिकेचा शेवटचा भाग १२ सप्टेंबरला प्रसारित होणार आहे. नुकतंच या मालिकेचं शूटिंग पूर्ण झालं आहे. मालिका संपल्यावर शिवानीने भावुक पोस्ट शेअर करत सर्वांचा निरोप घेतला आहे.
विशेष म्हणजे अभिनेत्रीने तिच्या पोस्टमध्ये मालिकेतील सगळे सहकलाकार, दिग्दर्शक तसेच पडद्यामागे काम करणारे मेकअप आर्टिस्ट, हेअरस्टालिस्ट यांचा उल्लेख करत प्रत्येकाचे आभार मानले आहे. याशिवाय प्रेक्षकांनी या मालिकेला भरभरून प्रेम दिलं याबद्दल शिवानीने कृतज्ञता देखील व्यक्त केली आहे.
शिवानी सुर्वेची पोस्ट
‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेचा सुंदर प्रवास अखेर संपला…जेव्हा तुम्ही एखाद्या नव्या प्रोजेक्टमध्ये काम करायला सुरुवात करता, तेव्हा तुम्हाला आधीच माहिती असतं की एक ना एक दिवस तो संपेलच… कारण, सगळ्याच चांगल्या गोष्टींना एक शेवट असतो. मी सगळ्यात आधी सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार मानते…मी या मालिकेत साकारलेल्या मानसीच्या भूमिकेवरचं तुमचं प्रेम म्हणजे माझ्यासाठी सर्वकाही होतं…मी नेहमीच तुमची आभारी असेन.
मानसी कुलकर्णी ( मालिकेतील गायत्री वहिनी ) – तू माझ्यासाठी प्रेरणास्थान आहेस. एका स्त्रीने किती खंबीर असावं याचं सगळ्यात सुंदर उदाहरण तू आहेस.
समीर परांजपे – तुझ्याबरोबर काम करून खूप मजा आली. तुझे विनोद, तुझी ऊर्जा, तुझी सर्वांना हसवण्याची पद्धत सगळंच सुंदर…समोर आलेल्या सगळ्या चेंडूंवर षटकार कसे मारावेत हे तुझ्याकडून शिकण्यासारखं आहे.
प्रणव प्रभाकर – अतिशय शांत, प्रतिष्ठित आणि खऱ्या अर्थाने सज्जन माणूस.
अमोघ चंदन – अनुभवात वरिष्ठ तरीही मजेदार प्रेमळ स्वभाव..
ऋग्वेद फडके – स्पष्ट बोलणारा, प्रोफेशनल… तुझ्याबरोबर काम करून खरंच खूप छान वाटलं.
मानसी घाटे – तुझ्याबरोबर शूट करण्याचा फारसा योग आला नाही पण, मुली तू खूप खंबीरपणे उभी राहिलीस…यासाठी तुझं खूप कौतुक आहे.
अंजली जोगळेकर आणि चंद्रशेखर कुलकर्णी – शब्द कधीच पुरेसे नसतील. तुम्हा दोघांसाठी खूप प्रेम, आदर आणि कृतज्ञता…
अर्थातच आमच्या टीमचे कर्णधार चंद्रकांत कणसे यांचेही विशेष आभार…सर, मी कधीही अशा दिग्दर्शकाबरोबर काम केलेलं नाहीये जो कोणत्याही परिस्थितीत इतका शांत असतो. सलाम आहे तुम्हाला…जर बॉस शांत असेल, तर टीम शांत असेल —हाच मी तुमच्याकडून शिकलेला सर्वात मोठा धडा आहे. तुमच्याबद्दल मनात कायम आदर असेल.
आता पडद्यामागचे सुपरहिरो…
स्वामी भागणे – कोणाच्याही लक्षात न येता शंभर गोष्टी दुरुस्त करणारा…
सनी पाटेकर – मेकअप करणारा आमचा जादूगार…मला रोज कॅमेऱ्यासाठी रेडी केल्याबद्दल धन्यवाद…
कविता शेठ – १० वर्ष झाली…आणि हा प्रवास असाच सुरू राहणार…माझी हेअरस्टायलिस्ट. मला माफ कर पण, आता तुझी सुटका नाहीच. आपण असंच एकत्र काम करत राहुयात..
सर्वांना खूप खूप प्रेम…अलविदा!
दरम्यान, शिवानीच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी, “या मालिकेला आम्ही खूप मिस करू” अशा असंख्य कमेंट्स केल्या आहेत. याशिवाय या मालिकेतील मुख्य अभिनेता समीर परांजपे ही पोस्ट वाचून म्हणतो, “अगं लोकांना डायबिटीज होईल ना हे वाचून…असो मी फक्त मजा घेतोय, तुझ्याबरोबर काम करून खूप मजा आली हिरोईन. अशीच पुढे जा…आणि जशी आहेस तशीच कायम राहा.”