Shivani Mundhekar On Aarambhi Ubale: अभिनेता शशांक केतकर आणि शिवानी मुंढेकर यांची प्रमुख भूमिका असलेली ‘मुरांबा’ ही मालिका सध्या मोठ्या चर्चेत आहे. शशांकने या मालिकेत अक्षय ही भूमिका साकारली आहे आणि शिवानीने मालिकेत रमा ही भूमिका साकारली आहे. याचे कारण म्हणजे मालिकेत सात वर्षांचा लीप आला आहे.
मालिकेत सात वर्षे पुढे गेली असून रमा आणि अक्षय यांच्या आयुष्यात मोठे बदल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. रमा व अक्षय यांची मुलगी मोठी झाली आहे. सात वर्षांची आरोही तिच्या बाबांबरोबर म्हणजेच अक्षयबरोबर राहते. तिला तिच्या आईबद्दल काहीच माहीत नाही. ती आकाशातील तारा झाली आहे, असे आरोहीला सांगितले गेले आहे. तिच्या वडिलांना ती तिच्या आईबद्दल अनेक प्रश्न विचारताना दिसत आहे. रमा आणि अक्षयच्या आयुष्यात जसे बदल झाले आहेत, तसेच त्यांचे लूकही बदलल्याचे पाहायला मिळत आहेत.
आता स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रमा, साई आणि त्यांच्याबरोबर मालिकेतील नवीन पात्र म्हणजेच अण्णासाहेब कर्णिक देखील आहेत. ही भूमिका अभिनेते श्रीरंग देशमुख यांनी साकारली आहे. ते म्हणाले की या दोन कलाकारांबरोबर मी ही भूमिका साकारणार आहे. मालिकेत शशांक, सुलेखा, आदितीदेखील आहेत. आता त्यांच्याबरोबर काम करायला मजा येणार आहे. अण्णासाहेब कर्णिक ही माझी नवीन भूमिका आहे.”
मालिकेतील रमा म्हणजेच अभिनेत्री शिवानी मुंढेकर म्हणाली, “तुम्ही बघतच असाल की आम्ही सगळेच वेगळे दिसत आहोत. आम्हाला नक्की कळवा, लीपनंतरची स्टोरी तुम्हाला कशी वाटत आहे. मालिका बघत राहा. आजपर्यंत तुम्ही आमच्यावर खूप प्रेम केलं आहे. पुढची गोष्टसुद्धा तुम्हाला आवडेल. आम्हाला खात्री आहे की तुम्ही मालिका आवडीने बघाल.”
मालिकेत अनेक लहान मुले असल्याचे साईने म्हणजे सिद्धार्थ खिरिडने सांगितले. तर रमा-अक्षयच्या मुलीबाबत आरोही हे पात्र साकारत असलेल्या आरंभी उबाळेबाबत शिवानी म्हणाली, “आपल्या मालिकेत एक गोड मुलगी आली आहे. ती खरंच खूप गोड आहे. तिला बघताना आणि तिचं काम बघताना तुम्हाला खूप मजा येईल.”
शिवानी प्रेक्षकांना उद्देशून म्हणाली की, तुम्हाला दोन वेण्यांची आठवण येतेय का हेही सांगा. त्यावर सिद्धार्थ तिला म्हणाला की, तुला दोन वेण्यांची आठवण येतेय का ते सांग. त्यावर शिवानी म्हणाली की मला हा लूक आवडला आहे. कारण- हा लूक पाच मिनिटांत होतो. दोन वेण्यांसाठी ४५ मिनिटे वगैरे लागायची.
दरम्यान, या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी रमाचा नवीन लूक छान असल्याचे म्हणत तिचा नवीन प्रवास पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे प्रेक्षकांनी कमेंट केल्या आहेत.