‘आता होऊ दे धिंगाणा’ या रिअॅलिटी शोच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. गेल्यावर्षी २०२२ या शोचा पहिला सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. अभिनेता सिद्धार्थ जाधव अर्थात प्रेक्षकांचा लाडका ‘#आपला सिद्धू’ने या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली होती. पहिल्या भागाला मिळालेल्या दमदार प्रतिसादानंतर स्टार प्रवाह वाहिनीने गेल्या महिन्यात या शोचा दुसरा सीझन सुरू करण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा : शाब्बास सूनबाई! शिवानी रांगोळेला पुरस्कार मिळताच सासूबाई मृणाल कुलकर्णींच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष
‘आता होऊ दे धिंगाणा’ या बहुचर्चित रिअॅलिटी शोच्या दुसऱ्या पर्वाला २१ ऑक्टोबरपासून सुरूवात झालेली आहे. या भागाचं सूत्रसंचालनदेखील सिद्धार्थ जाधव करत आहे. दुसऱ्या पर्वाच्या पहिल्या भागात ‘ठरलं तर मग’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतील कलाकार सहभागी झाले होते. या एपिसोडला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. या शोच्या टीआरपीचे आकडे नुकतेच समोर आले आहेत. सिद्धार्थचा ‘आता होऊ दे धिंगाणा’ कार्यक्रम ‘महाराष्ट्राचा नंबर १ नॉन फिक्शन शो’ ठरला आहे. यासंदर्भात सिद्धार्थ जाधवने पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
सिद्धार्थ जाधवची पोस्ट
मायबाप रसिक प्रेक्षकांना मनापासून आभार…
मेहनतीचं असं फळ मिळालं की बरं वाटतं. “आता होऊ दे धिंगाणा पहिला सीजन” लोकांना आवडला होता, दुसरा सीजन करताना लोकांना तो कसा आवडेल? याची धाकधूक होती, पण पहिल्याच एपिसोडला एवढा तुफान रिस्पॉन्स… खरंच खूप बरं वाटतं, सतिश राजवाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली shirprasad आणि सुमेध, फ्रेम्सची संपूर्ण टीम स्टार प्रवाहच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीचे हे फळ आहे. तुम्ही सगळे मायबाप रसिक प्रेक्षक महाराष्ट्राचा नंबर १ नॉन फिक्शन शो म्हणून तुम्ही “आता होऊदे धिंगाणा२ “ला आशीर्वाद दिलात, खरंच खूप बरं वाटतंय. नवीन काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे.
हे पोस्ट करताना मनात फक्त wow फिलिंग आहे…Wow… वा किती मस्त!
असंच प्रेम असुदे….
दरम्यान, सिद्धार्थ जाधवची पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. नॉन फिक्शन शोमध्ये सिद्धार्थच्या ‘आता होऊ दे धिंगाणा’ने बाजी मारली असून, मालिका विश्वात ‘ठरलं तर मग’ या मालिकेचा दबदबा कायम आहे. रिअॅलिटी शोच्या यादीत ‘आता होऊदे धिंगाणा२’ पहिल्या स्थानी, दुसऱ्या स्थानी ‘चला हवा येऊ द्या’, तिसऱ्या स्थानावर ‘सारेगमप’ यानंतर अनुक्रमे चौथ्या-पाचव्या स्थानी ‘बिग बॉस वीकेंडचा वार’ आणि ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमाचा क्रमांक लागतो.