Smriti Irani Fee : छोट्या पडद्यावर एकेकाळी ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ ही मालिका प्रचंड गाजली होती. यामधील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं एक स्थान निर्माण केलं आहे आणि ते स्थान अजूनही कायम आहे. अशातच आता या हिट मालिकेचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या मालिकेनिमित्त ‘तुलसी’ फेम अभिनेत्री स्मृती इराणी यांनी छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन केलं आहे.

गेल्या काही वर्षात स्मृती इराणी राजकारणात सक्रिय होत्या. त्यामुळे त्यांनी कलाक्षेत्रातून काही काळ ब्रेक घेतला होता. मात्र, सध्या स्मृती इराणी तुलसी विराणीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांच्या ‘क्योंकि सास भी कभी बहू थी २’ या मालिकेने अवघ्या काही दिवसांतच रेकॉर्ड मोडले आहेत, त्याचबरोबर स्मृती इराणी यांनीसुद्धा कमाईबाबत मोठा विक्रम केला आहे.

‘क्योंकि सास भी कभी बहू थी २’ या मालिकेतून ‘तुलसी’ म्हणून टेलिव्हिजनवर परतलेल्या स्मृती इराणी टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री ठरल्या आहेत. स्मृती इराणी प्रत्येक एपिसोडसाठी तब्बल १४ लाख रुपये घेत आहेत. यामुळे त्यांनी ‘अनुपमा’ मालिकेच्या प्रत्येक एपिसोडसाठी ३ लाख रुपये घेणाऱ्या रुपाली गांगुली, तसंच दोन लाखांपर्यंत मानधन घेणाऱ्या हिना खान यांनाही मागे टाकलं आहे.

याबाबत CNN News18 शी बोलताना स्मृती इराणी म्हणाल्या, “जो व्यक्ती सातत्याने चांगली कामगिरी करतो, ज्यामुळे त्या मालिकेची टीआरपी वाढते, त्याला योग्य मोबदला मिळायलाच हवा. माझं मानधन हे अशा प्रकारच्या व्यावसायिक दृष्टीकोनाचं उदाहरण आहे आणि हे सगळं सहजासहजी मिळालेलं नाही, यामागे खूप मेहनत आहे.”

काही वृत्तांनुसार, स्मृती इराणी ‘क्योंकि सास भी कभी बहू थी २’ शोच्या प्रत्येक एपिसोडसाठी १४ लाख रुपये मानधन घेत आहेत. या मालिकेचे १५० एपिसोड प्रसारित होणार आहेत, त्यामुळे या मालिकेमधून स्मृती इराणी तब्बल २१ कोटी रुपये कमावणार आहेत. यामुळे मानधनाबाबत त्यांनी बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदूकोणलाही मागे टाकलं आहे. शाहरुख खानबरोबरच्या ‘पठान’ चित्रपटासाठी दीपिकाला एकूण १५ कोटी रुपये मानधन मिळालं होतं.

दरम्यान, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’च्या नव्या भागामध्ये स्मृती इराणी आणि अमर उपाध्याय मुख्य भूमिकेत असून, त्यांच्यासह हितेन तेजवानी, गौरी प्रधान, रोहित सुचांती, शगुन शर्मा, अमन गांधी, तनिषा मेहता, अंकित भाटिया आणि प्राची सिंग यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सध्या मालिकेला प्रेक्षक चांगलाच प्रतिसाद देत आहेत. जुन्या पिढीसह आजच्या पिढीमधील प्रेक्षकांनासुद्धा ही मालिका आवडत आहे.