Sonali Bendre On Hosting Pati Patni Aur Panga : सोनाली बेंद्रे सध्या एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे. आजवर तिनं अनेक चित्रपटांत नायिका म्हणून काम केलं आहे. परंतु, आता अभिनेत्री सूत्रसंचालनाची भूमिका पार पाडत आहे. त्यामधून ती बऱ्याच दिवसांनी टेलिव्हिजनवर परतली आहे.

सोनाली तिच्या या वेगळ्या भूमिकेतूनही प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. सोनाली ‘पती, पत्नी और पंगा’चं सूत्रसंचालन करीत आहे. त्यामध्ये तिच्यासह मुनव्वर फारुकीसुद्धा आहे. अशातच अभिनेत्रीनं नुकतीच ‘ई टाइम्स’ला मुलाखती दिली. त्यामध्ये तिनं कार्यक्रमाबद्दल, तसेच तिच्या वैवाहिक जीवनाबद्दलही माहिती दिली आहे.

‘पती पत्नी और पंगा’बद्दल सोनाली बेंद्रेची प्रतिक्रिया

सोनाली बेंद्रे म्हणाली, “हा कार्यक्रम करताना मला खूप मजा येत आहे; पण मी हे अजिबात नाकारणार नाही की, हे खूप तणावाचं काम आहे. मुनव्वरला याची सवय आहे. अशा कार्यक्रमांमध्ये त्यानं काम केलं आहे; परंतु, माझ्यासाठी हे सगळं नवीन आहे. त्याची विनोदी शैली खूप चांगली आहे. त्यामुळे मला प्रश्न पडतो की, मला असं जमणार आहे का. हा संपूर्ण अनुभव माझ्यासाठी खूप आव्हानात्मक आहे. पण तुम्हाला माहितीये की, मला आव्हानं खूप आवडतात. त्यामुळे मी हे करणार आहे. मी प्रार्थना करीत आहे की, लोकांना फक्त हा कार्यक्रमच नाही, तर यातील माझं कामही आवडावं.”

कार्यक्रमाबद्दल अभिनेत्री पुढे म्हणाली, “मी पहिल्यांदाच यातील सगळ्यांना भेटणार आहे. हे जग आणि ही इंडस्ट्री खूप वेगानं पुढे जात आहे. एका गोष्टीनं माझं लक्ष वेधलं ते म्हणजे लग्न संस्था. मी कार्यक्रमाच्या मेकर्सला हा प्रश्न विचारला की, तुमचा लग्नावर विश्वास आहे का? कारण- माझा लग्नावर विश्वास आहे. आयुष्य जगताना जेव्हा एखादं जोडपं चढ-उतारांचा सामना करत असतं तेव्हा तुमच्या बाजूनं कोणीतरी असणं ही भावना खूप छान आहे. अमूल्य आहे.” पती, पत्नी और पंगा हा कार्यक्रम शनिवार व रविवार संध्याकाळी ९:३० वाजता प्रसारित होत असतो. नुकताच २ ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम सुरू झाला आहे.

सोनाली बेंद्रेची गोल्डी बहल यांच्याबरोबरच्या वैवाहिक जीवनाबद्दलची प्रतिक्रिया

सोनाली म्हणाली, “पूर्वी मला भांडणाची खूप भीती वाटायची; पण आता काही वेळा मी मुद्दाम भांडते. कारण- त्यामुळे मनोरंजन होतं. नवरा-बायकोमध्ये पंगे होत असतात. जेव्हा नवरा-बायकोचं कुठल्या तरी गोष्टीमुळे मनोरंजन होत असेल आणि त्यातून त्यांना आनंद मिळत असेल, तर त्यामुळे वैवाहिक जीवनात एक गंमत येते. परंतु, गोष्टी अति प्रमाणात ताणल्या गेल्या की, त्यामुळे गोष्टी बिघडू शकतात. आमच्या कार्यक्रमातही तुम्हाला असंच काहीसं आंबट-गोड नातं असलेली जोडपी पाहायला मिळणार आहेत.”

दरम्यान, सोनाली बेंद्रेनं चित्रपट निर्माते गोल्डी बहल यांच्याबरोबर लग्न केलं होतं. दोघांचा प्रेमविवाह झाला आहे. त्यांनी १२ नोव्हेंबर २००२ साली लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाला १३ वर्षे पूर्ण झाली आहेत. या जोडीला रणबीर नावाचा एक मुलगासुद्धा आहे.